- रवींद्र देशमुख
मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात अनेक निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुकांत भाजपच वरचढ पक्ष ठरला. त्यामुळे सहाजिकच रावसाहेब दानवे यांचे पक्षात वजन वाढले. जालन्याचे खासदार असलेले दानवे मात्र औरंगाबादच्या प्रेमात पडल्याचे चित्र आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून दानवे यांनी औरंगाबादवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. अर्थात प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रासह औरंगाबादची जबाबदारी असणार यात शंका नाही. परंतु, यापुढे जाऊन दानवे यांनी औरंगाबादेत भाजपचे पक्ष संघटन वाढण्यास प्रयत्न केले. त्यामुळे दानवे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये छोट्यामोठी कुरबूर अनेकदा पाहायला मिळाली. मात्र या कुरबुरीकडे दानवे यांनी फारसे लक्ष दिले नाही. त्यात आता खैरे यांचा पराभव झाल्यामुळे दानवे यांच्यासाठी औरंगाबादची खेळपट्टी मोकळी झाली आहे.
जालन्यातून सलग चार वेळा लोकसभेवर जाणारे दानवे यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु, दानवे लोकसभेत कमी आणि औरंगाबादेतच अधिक रमताना दिसत आहेत. जालन्याला विमानतळ नसल्यामुळे दानवे यांना मतदार संघात जाण्यासाठी व्हाया औरंगाबाद प्रवास करावा लागतो. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या काळात अब्दुल सत्तार यांच्याशी जवळीक आणि जावाई हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याचे आरोप दानवे यांची औरंगाबादशी वाढती जवळीक अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून विजयाची हॅटट्रीक करणारे चंद्रकांत खैरे यांना यावेळी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे नव्हे तर दानवे यांनी युतीधर्म तोडल्यामुळे आपला पराभव झाल्याचे आरोपच खैरे यांनी दानवे यांच्यावर केले. त्याला दानवे यांनी फारसे गंभीर्याने घेतले नाही.
दानवे यांच औरंगाबाद प्रेम स्पष्ट करणारी आणखी एक घटना आता घडली आहे. औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या विकासासाठी विमानसेवा वाढविण्याची मागणी लोकसभेच्या अधिवेशनात केली होती. त्यात आता दानवे यांनी उडी घेतली आहे. खुद्द दानवे यांनी औरंगाबादच्या शिष्टमंडळासह केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली. तसेच औरंगाबादची विमानसेवा वाढविण्यासंदर्भात निवेदन दिले. त्यामुळे दानवे यांचं औरंगाबादवर असलेलं प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले.