Kirit Somiya on Anil Parab: 27 मे रोजी सक्तवसुली संचालनालयाने (ED) शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापेमारी केली होती. अनिल परबांना दापोलीमधील जमीन विकणाऱ्या विभास साठेंच्या कोथरुडमधील घरावरही छापा टाकण्यात आला. यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांनी विभास साठेंचा मनसुख हिरेन होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे.
ईडीने अनिल परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापेमारी केली. यामध्ये अनिल परब यांना दापोलीतील रिसॉर्टची कथित विक्री करणारे विभास साठे यांच्या निवासस्थान, कार्यालयाचाही समावेश आहे. या रिसॉर्टप्रकरणी कारवाई सुरू झाल्यानंतर किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील व्यावसायिक विभास साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. साठे यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत सोमय्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना साठेंच्या सुरक्षेसाठा पत्र लिहीले आहे.
किरीट सोमय्या यांनी म्हटले की, "मंत्री अनिल परब रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. परब यांनी विभास साठे कडून जमीन घेतली होती. "विभास साठे यांचे "मनसुख हिरण" होऊ नये." विभास साठे यांच्या जिवाला धोका लक्षात ठेऊन त्यांचा सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी अशी विनंती मी महासंचालक यांना केली आहे," अशी माहिती सोमय्यांनी दिली.
सोमय्यांच्या पत्रात काय आहे?किरीट सोमय्यांनी महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, "अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. या घोटाळ्यासंबंधी अनेक तपास यंत्रणा, संस्थांनी तसंच पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी अनिल परब आणि त्यांच्या साई रिसॉर्ट एनएक्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल परब यांनी 2017 मध्ये विभास साठे यांच्याकडून दापोली येथील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील जमीन घेतली व फसवणूक करत रिसॉर्ट बांधला. अनिल परब या घोटाळ्यामुळे अडचणीत आले असून आम्हाला भीती वाटते की, अनिल परब हे विभास साठेंवर दडपण आणणार. विभास साठे यांचे मनसुख हिरेन होऊ नये हे पाहणे महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी आहे. विभास साठे यांच्या जीवाला धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी. त्यांचा मनसुख हिरेन होऊ नये हे पहावे ही विनंती."