- सिद्धेश आचरेकरमालवण : दर्यावर अधिराज्य गाजवणारा ‘दर्याराजा’ नव्या मत्स्य हंगामासाठी आतुर झाला आहे. या वर्षीचा मत्स्य हंगाम बुधवार, १ आॅगस्टपासून सुरू होत आहे. मत्स्य हंगामाच्या सुरुवातीपासून पारंपरिक मच्छीमार रापणीच्या मासेमारीला सुरुवात करतात. मासेमारी हंगामासाठी किनारपट्टी रापणकरांनी गजबजून सोडली आहे. होड्यांना रंगरंगोटी, पूजा-अर्चा करून नव्या हंगामाचा श्रीगणेशा होणार आहे.दरम्यान, महाराष्ट्र शासनाने पर्ससीन मासेमारीवर घातलेले नियम व स्थानिक मच्छीमारांच्या एकजुटीच्या लढ्यामुळे गेल्या वर्षभरात सैतानी मासेमारीला लगाम बसला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याच्या मत्स्योत्पादनात कमालीची वाढ झाल्याचे मत्स्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे या वर्षीच्या मत्स्य हंगामात संघर्ष होऊ नये, यासाठी मत्स्य विभागासह संबंधित यंत्रणांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.केंद्र शासनाने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत मासेमारी बंदी जारी केली. हा ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी ३१ जुलैला संपला आहे. १ आॅगस्टपासून मासेमारी सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायावर चरितार्थ चालविणारे मच्छीमार मासेमारीसाठी जाण्यास सज्ज असून मोठे मच्छीमार खऱ्या अर्थाने नारळीपौर्णिमेनंतरच मासेमारी करण्यास उतरणार आहेत.मत्स्य विभागाला पोलीस व नौदलाची साथपरराज्यातील नौकांचे अतिक्रमण रोखण्यासाठी पोलीस प्रशासन व नौदलाच्या संयुक्त विद्यमाने मत्स्य विभागाला गस्त घालणे आवश्यक आहे. तर केंद्र शासनाने प्रकाशझोतातील मासेमारीवर बंदी घातल्याने ते रोखणे आव्हानात्मक असणार आहे.गतवर्षी प्रकाशझोतातील मासेमारीला बंदी असतानाही मालवणच्या समद्रात गोवा राज्यातील नौका मासेमारी करत असताना मालवणच्या मच्छीमारांनी त्यांना मालवणी हिसका दाखवला होता. मात्र, यात दर्याराजाच अडकला होता. याबाबत प्रशासनाने विचार करणे आवश्यक आहे.पोलीस प्रशासन ‘अलर्ट’ : परराज्यातील मासेमारी नौकांची वाढती घुसखोरी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दिसून आल्यास व स्थानिक मच्छीमारांसोबत संघर्षाची स्थिती उद्भवल्यास समुद्री हवामानाचा अंदाज घेत स्पीड बोट समुद्रात उतरवल्या जातील, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली आहे.
दर्याराजा आजपासून दर्यावर होणार ‘स्वार’; रापणकर मच्छीमार स्वागतासाठी आतुर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 12:01 AM