शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अवघा रंग एक झाला...

By admin | Published: July 02, 2017 5:53 AM

आषाढीची वारी आनंदाची, उत्साहाची, भक्तिभावाची. त्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक संस्था काम करत असतात. त्या

आषाढीची वारी आनंदाची, उत्साहाची, भक्तिभावाची. त्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक संस्था काम करत असतात. त्या सेवेतूनच विठ्ठल भेटल्याचा आनंद लुटत असतात. हे सेवेकरी अनेकदा वारीसोबतच चालत असतात, तर कधी वारी ज्याज्या ठिकाणी मुक्कामाला आहे, तेथे आधीच पोहोचून आपली सेवा वारकऱ्यांच्या चरणी रुजू करत असतात. मुखाने ‘माऊली... माऊली’चा गजर आणि हाताने अखंड सेवेचे काम... अशा अनेक व्यक्ती, संस्था वारीत पाहायला मिळतात. वारकऱ्यांना गेली ३५ वर्षे वैद्यकीय सेवा पुरवणारे ठाण्यातील डॉ. ओमप्रकाश शुक्ल यांनी टिपले आहेत, गेल्या तीन पिढ्यांतील वारी पाहताना त्यात त्यांना जाणवलेले बदल... १९८२ सालापासून मी वारकऱ्यांना ज्ञानदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देत आहे. ही सेवा आजही अखंडपणे सुरू आहे. ती देत असताना वारीमध्ये होत असलेले अनेक बदल पाहिले. दिवसागणिक वारी प्रसिद्ध झाली खरी; पण त्यातील प्रेम, परंपरा, भक्तिभाव आजही कायम आहे. पूर्वी वारीमध्ये समाजकारण आणि अर्थकारण पाहायला मिळत असे, पण गेल्या काही वर्षांत समाजकारण, अर्थकारणाबरोबर राजकारणानेही थोडा शिरकाव केला आहे. पूर्वी नवस करणारे, त्याची पूर्तता करणारे वारीमध्ये येत असत. परंतु, आता हवशे-गवशेही येऊ लागले आहेत. वारीचा सोहळा हा माऊलीचा सोहळा असला, तरी माऊलीला ज्यांची चिंता असते, तो वारकरी ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण, त्याला भेटायचे असते, ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते ती माऊलीची. या ३५ वर्षांमध्ये मी पाहिले ते वारीमध्ये चालणारे वारकरी, टाळांचा निनाद करत भजन म्हणणारे टाळकरी आणि वारीची सेवा करणारे सेवेकरी. वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची वाढती संख्या पाहता त्यांच्यासाठी असलेल्या व्यवस्थांमध्येही वाढ होत आहे. यात तंबूंची, पाण्याची, आरोग्याची, दळणवळण, पोलीसव्यवस्था, चहाच्या गाड्या, धोबी आदी अनेक पूरक व्यवस्था वाढल्या आहेत. एकीकडे अशा व्यवस्थांमध्ये वाढ झाली असली, तरी वाहनांची संख्या वाढल्याने प्रदूषणही वाढले आहे. रस्त्यांची लांबी कायम आहे. पण, प्रशासनाने रस्त्यांची रुंदी भरपूर वाढवली आहे. रस्त्यांच्या कडेला पूर्वी जिरायती जागा भरपूर असायच्या. त्यामुळे वारकऱ्यांना मुक्कामाच्या जागी तंबू ठोकायला भरपूर जागा मिळायची. आता मधल्या काळात कालवे, जलसिंचन केल्याने तसेच पंप व विहिरी वाढल्याने उसाची लागवड, डाळिंबाच्या व केळीच्या बागा वाढल्या आहेत. दुसरीकडे गावांची सुबत्ता वाढली; पण वारकऱ्यांची स्थिती मात्र वेगळी झाली. रस्त्याच्या बाजूला असणारी जागा कमी झाल्याने दिंडीचे मुक्काम गावापासून अलीकडे चार किमी व पुढे चार किमीपर्यंत पसरले. त्यामुळे अनेकदा मूळ गावापासून वारी थोडी दूरवर विसावते. वारीच्या काळात आळंदी ते सासवडपर्यंत असलेला पाऊसही अनुभवायला मिळतो. हा पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत असतो. त्यानंतर, जेजुरीपासून वाखरीपर्यंत पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. यादरम्यान मात्र फार कमी वेळा धोधो कोसळणारा पाऊस अनुभवायला मिळतो. आता या वारीत छत्र्यांची संख्या कमी होत आहे आणि त्या जागी स्वत:च्या संरक्षणासाठी वारकरी प्लास्टिकचे इरले घेऊन येतात. त्यामुळे मोकळेपणाने चालता येते. पूर्वी सेवेकरी ट्रकच्या आत वारकऱ्यांच्या वळकट्या असायच्या व बाहेर कंदील बांधलेले असायचे. आता मात्र टॉर्च व इमर्जन्सी लाइट्सची संख्या वाढली आहे. बऱ्याच दिंडी आयोजकांनी स्वत:चे जनरेटर घेतलेले आहे. लाउड स्पीकर्स, मोबाइलच्या संख्येतही भरपूर वाढ झाली आहे. पूर्वी सातारा किंवा सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर जिल्हाधिकारी अथवा आमदार किंवा मंत्री हे माऊलींच्या रथाचे स्वागत करण्यास आले की, त्यांच्या व्यवस्थेसाठी पाच ते दहा पोलीस दिसायचे. आता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या संख्येत खूपच वाढ झालेली पाहायला मिळते. त्यामुळे पूर्वीपासून वारीमध्ये पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करणाऱ्या वारकऱ्यांबरोबर आता हा बंदोबस्ताचा खाकी रंगही लक्ष वेधून घेणारा ठरतो. पूर्वी वारीमध्ये केळी व चहाचे मोफत वाटप व्हायचे. आता बऱ्याच ठिकाणी भजी, वडे, भेळ आदी पदार्थांचेही वाटप होते. दिंडीमध्ये राजकीय नेत्यांनी शिरकाव केल्याने त्यांच्याकडून वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रोजच्या जेवणामध्ये, नाश्त्यामध्ये विविध मिष्टान्ने वाढली जात असल्याचे पाहायला मिळते. परंतु, यामुळे वारकऱ्यांना पोटाचे विविध आजारही होऊ लागले आहेत. वारी हायटेक झाली, असे सर्व जण म्हणत असले, तरी प्रत्येक गावाजवळ सरपंच, सभासद, आमदार, कारखानदार आदी लोकांकडून स्वागताच्या निमित्ताने पोस्टर-फ्लेक्सचे युद्ध सुरू असलेले दिसते. वारीमध्ये येणाऱ्या महिलांचा सहभाग लक्षणीय असतो. वर्षानुवर्षे सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यांच्या वेशभूषेमध्ये बदल झाल्याचे पाहायला मिळते. नऊवारी पातळाची जागा आता गोल पातळ आणि पंजाबी ड्रेसने घेतली आहे. वारीत पूर्वी रस्त्याच्या कडेला पत्रावळ्या, मलमूत्राची घाण दिसून यायची. परंतु, आता स्वच्छतेविषयी होत चाललेली जनजागृती आणि त्यामुळे वारीत वाढणारी स्वच्छता, यामुळे ही घाण हळूहळू कमी होताना दिसते. या वारीत जसे उघड्यावर मलमूत्राचे प्रमाण कमी झाले, तसे तंबाखू खाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. हल्ली ‘निर्मल वारी’ पार पडते. त्यात स्वयंसेवकांकडून वारी पोहोचण्यापूर्वी फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली जाते. अशा व्यवस्थांमुळे वारीतील स्वच्छता वाढत चालली आहे. वारीमध्ये चालणाऱ्या प्रत्येक माणसाच्या कपाळावर विशिष्ट प्रकारचा गंध लावून पोट भरणारे बरेच सेवेकरी दिसतात. पूर्वी वारीमध्ये १० रुपयांना १०० लिंबे मी घेतलेली आहेत. आता मात्र १० रुपयांना पाच ते सहा लिंबे मिळतात. वारीमध्ये वेळापूर येथे ‘धावा’ ही एक जागा आहे, जिथे एकनाथ महाराजांची भारुडे होत असत. आता वेळापूरची वस्ती वाढल्याने व अनेकांनी बंगले बांधल्याने या ठिकाणी भारुडे बघायला मिळत नाहीत.या वारीमध्ये येणाऱ्या तीन पिढ्या मी पाहिल्या आहेत. पूर्वी लहान मुलांना त्यांची आई पाठीवर बांधून किंवा कडेवर घेऊन जात असे. आता मुले सोबत किंवा प्रसंगी गाडीतून जाताना दिसतात. वारीत तरुणांची संख्याही वाढलेली पाहायला मिळते. ही तरुण मंडळी कीर्तनकार म्हणूनही सहभागी होतात. पूर्वी वारकऱ्यांसाठी फळांचे, चहा, भाजीवाल्यांचे स्टॉल्स लागत. परंतु, आता त्यासोबतच पुरीभाजीपासून शिरा, उपम्याचे स्टॉल्सही पाहायला मिळतात. या वारीत कोळी समाजाची वारी ही लक्ष वेधून घेणारी असते. या समाजाचे वारकरी हे गुलाबी आणि निळ्या रंगांचे वस्त्र परिधान करतात. आज गुलाबी वस्त्र, तर उद्या निळे अशा प्रकारची त्यांची वारीतील रचना असते आणि ही वारी खरोखर प्रेक्षणीय असते. वारीमध्ये भजन-कीर्तन सादर करण्याची वर्षानुवर्षे परंपरा आहे. हे भजन-कीर्तन दूरपर्यंत ऐकायला येत नसे. परंतु, आता लाउड स्पीकर्समुळे ते लांब अंतरावर असलेल्या वारकऱ्यालाही ऐकायला मिळते. दिंडीच्या आयोजकांकडून वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. पूर्वी हे आयोजक गटागटांमध्ये असलेल्या वारकऱ्यांना प्रत्यक्षात जाऊन काय हवेनको, खाण्यापिण्याबाबत विचारत असत. आता याच लाउड स्पीकर्सच्या माध्यमातून भोजनाची सोय केल्याचे ते सर्वांना सांगतात. ‘कुणीही उपाशी झोपू नका, आमच्याकडे जेवणाची व्यवस्था केली आहे’, असे आवाहन हे आयोजक करीत असतात. पुण्याचे काम म्हणून गावातील रहिवासी हे मोजक्या वारकऱ्यांना जेवू घालत. आता गावची सुबत्ता वाढल्याने त्यांचा आर्थिक स्तर उंचावल्याने किमान १०-१५ वारकऱ्यांना एकेक कुटुंब भोजन देते. पूर्वी १० ते १२ आमदारांची मुले वारीमध्ये मोफत सेवा करणाऱ्या आरोग्य पथकांना शिरा, पोहे आदी पदार्थ नाश्त्यासाठी देत आणि असे केल्याने आम्हाला पण थोडे पुण्य मिळेल, असे म्हणताना दिसत. पण, आता वारीतच वाढत चाललेल्या राजकारण्यांच्या सहभागाने वारकऱ्यांची जेवणाची वेळही आता उशिराची झाली आहे, ही खेदाची बाब आहे. वारीमध्ये विविध दिंड्यांमध्ये जेवण वाढताना वारकरी मंडळी भात राम, पाणी राम, भाजी राम, साखर राम, लाडू राम असे म्हणताना दिसतात. या निमित्ताने वारंवार रामाचे स्मरण होत असे. आता माऊलीचा गरज होताना दिसतो. वारीत आरोग्य सेवा पुरवणाऱ्या सेवाभावी संस्थांची संख्या १९८२ साली तीन होती. आता ती वाढली असून दोनशेच्या पुढे गेली आहे. आधुनिकतेच्या काळात वारीत बदल होत गेले, असले तरी वारीतील शिस्त, विनम्रता, प्रेमभाव, त्या माऊलीचा रथ आणि विठोबाची मूर्ती हे मात्र बदललेले नाही. दरवर्षी ज्या ज्या वारकऱ्यांना औषधोपचार केलेले असतात, ते वारकरी पुढच्या वर्षी येऊन आम्हाला आवर्जून भेटतात आणि आमच्या पाठीवर विश्वासाचा, आशीर्वादाचा हात टाकतात. हीच आमच्या कामाची पावती असते. विठोबाच्या रूपानेच जणू काही हे वारकरी आम्हाला भेटत असतात. या वारीच्या काळात आठ ते दहा लाख वारकऱ्यांना पायी चालताना पाहणे, हा एक मोठा सोहळाच असतो. त्यापलीकडे आणखी काय हवे?- शब्दांकन : प्रज्ञा म्हात्रे