लोणावळा - लोणावळा शहर व परिसरात सर्वत्र रात्रीपासून धुक्याची दाट चादर पसरल्याने दिवस उगवल्यानंतरही काही अंतरावरील स्पष्टपणे दिसत नसल्याने महामार्ग व द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. मागील दोन तिन दिवसांपासून लोणावळा परिसरात पहाटेच्या वेळी दव वर्षाव होत आहे. पावसाळा संपून थंडीची सुरुवात झाल्याची ही लक्षणे आहेत. चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती, मात्र लोणावळा शहर व परिसरात पावसाचा मागमूसही लागला नाही. सध्या मात्र हवामानात बदल होऊन थंडी पडायला सुरुवात झाली आहे. दिवसा हवामानात ऊष्मा जाणवत असली तरी सायंकाळनंतर वातावरणात गारवा येऊ लागला आहे. आज पहाटेपासून सर्वत्र धुके पसरल्याने काही मिटर अंतरावरील देखिल स्पष्ट दिसत नाही. वाहनचालक गाडीच्या लाईट तसेच इंडिकेटर दिवे लावून वाहने चालवत होते. पहाटे पायी चालण्याकरिता जाणार्यांकरिता धुक्याची ही चादर वेगळीच पर्वणी ठरली. धुकं ऐवढ दाट आहे की त्यामुळे अद्याप सुर्यनारायणाचे दर्शन देखिल झालेले नाही.
लोणावळा परिसरात धुक्याची दाट चादर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 7:39 AM