मुंबई/दिल्ली: काँग्रेसच्या १३१ व्या स्थापना दिनीच मुंबई काँग्रेसचे मुखपत्र ‘काँग्रेस दर्शन’मध्ये पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व पंडित नेहरू यांच्याबद्दल वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध झाल्याने पक्षाची चांगलीच पंचाईत झाली. विरोधकांनी टीकेचा सूर आळवताच कंटेन्ट एडिटर सुधीर जोशींची हकालपट्टी केली. नरेंद्र वाबळे हे ‘काँग्रेस दर्शन’ चे इनचार्ज संपादक होते. अलीकडेच हिंदी आवृत्ती सुरू झाली. कंटेन्ट एडिटर म्हणून सुधीर जोशींवर जबाबदारी होती. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर विशेष अंक काढण्यात आला. मात्र, शहानिशा न करता इंटरनेटवरील मजकूर प्रसिद्ध करण्यात आला. ‘सोनिया गांधींचे वडील फॅसिस्ट होते. आपली मुलं भीक मागतील, पण राजकारणात येणार नाहीत, असे मत सोनिया गांधींनी व्यक्त केले होते,’ अशी वादग्रस्त विधाने या मासिकात प्रकाशित करण्यात आली. या चुकीबद्दल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी तीव्र नाराजी व दिलगिरी व्यक्त केली. याची चौकशी होणार असून, कंटेन्ट एडिटर सुधीर जोशी यांची हकालपट्टी केल्याचे त्यांनी सांगितले.मुंबईत वर्धापन दिन उत्साहातमुंबईतील ज्या तेजपाल हॉलमध्ये २८ डिसेंबर, १८८५ रोजी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्याच हॉलमध्ये मुंबई काँग्रेसच्या वतीने पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष निरुपम यांनी आॅगस्ट क्रांती मैदान येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर तेजपाल हॉल येथील गोकुळदास तेजपाल यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करण्यात आली, तसेच ध्वजवंदनही झाले. यावेळी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह, माजी आमदार सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे, मधु चव्हाण, मुंबई काँग्रेस सरचिटणीस संदेश कोंडविलकर, भूषण पाटील, उपाध्यक्ष जयप्रकाश सिंग, गोविंद सिंह, प्रवक्ते गजेंद्र लष्करी मनपा विरोधी पक्षनेता बाळा आंबेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.सत्य बाहेर आले - भाजपा : ‘काँग्रेसने दडवून ठेवलेले सत्य अखेर बाहेर आलेच,’ अशा शब्दांत भाजपाने काँग्रेसच्या मुखपत्रात पं. जवाहरलाल नेहरू आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल प्रकाशित झालेल्या लेखावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा लेख छापल्याबद्दल या पत्रिकेचे संपादक आणि काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांचे अभिनंदन करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
वर्धापन दिनी वादाचे ‘दर्शन’!
By admin | Published: December 29, 2015 1:48 AM