पुणे : एखादी कथा, परिणामकारक, मनोरंजनात्मक व भावनात्मक पद्धतीने सांगण्याचं उत्तम माध्यम म्हणजे नृत्यकला. कथ्थक, भरतनाट्यम्सारखे नृत्यप्रकार नेहमीच पाहायला मिळतात; मात्र बासरीच्या मनमोहक सुरांवर हृदयाचा ठाव घेणारे डॉ. अन्वेशा महांता यांनी सादर केलेले आसाममधील क्षत्रिय नृत्य पाहण्याची संधी पुणेकरांना शनिवारी मिळाली.निमित्त होते, नॉर्थइस्ट फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभाचे. या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांच्या हस्ते झाले. या वेळी चित्रपट महोत्सवाचे संचालक, सी. सेंतल राजन, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे संचालक भूपेंद्र कँथोला, सिंबायोसिस विद्यापीठाचे कुलगुरु शां. ब. मुजुमदार उपस्थित होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) च्या वतीने आणि डायरेक्टोरेट आॅफ फिल्म फेस्टिव्हल्स (डीएफएफ), फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय), सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी व नॉर्थईस्ट कम्युनिटी आॅर्गनायझेशन यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
ईशान्य भारताच्या संस्कृतीचे दर्शन
By admin | Published: January 30, 2017 2:39 AM