डी.एस.कुलकर्णींना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 02:39 AM2017-12-20T02:39:51+5:302017-12-20T02:40:27+5:30
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी दिलेल्या मुदतीत गुंतवणूकदारांच्या थकवलेल्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम म्हणजेच ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यास मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. पोलीस कारवाईत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिल्याने डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
मुंबई : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांनी दिलेल्या मुदतीत गुंतवणूकदारांच्या थकवलेल्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम म्हणजेच ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यास मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. पोलीस कारवाईत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिल्याने डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डीएसके यांनी गुंतवणूकदारांचे एकूण २०० कोटी रुपये थकवले आहेत. त्यानुसार न्यायालयाने डीएसके यांना गेल्या सुनावणीत २०० कोटींपैकी ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याकरिता १५ दिवसांची मुदत दिली. १५ दिवसांत ५० कोटी रुपये भरले नाही, तर त्यांना दिलेले संरक्षण काढण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट बजावले होते. ही मुदत मंगळवारी संपली.
मंगळवारच्या सुनावणीत डीएसकेंच्या वकिलांनी १५ दिवसांत रक्कम जमा करू शकलो नाही, असे न्यायालयाला सांगत रकमेची जुळवाजुळवी करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मागितली. मात्र, न्या. साधना जाधव यांनी मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार देत डीएसके यांना दिलेले अंतरिम संरक्षण काढून घेतले.
याबाबत आधीचा आदेश स्पष्ट असून तुम्ही योग्य ती कारवाई करू शकता, असे निर्देश न्यायालयाने पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले. त्यामुळे आता डीएसके यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांचे पैसे थकविल्याबद्दल डीएसके यांच्यावर पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी त्यांच्या मालमत्तांची सर्व कागदपत्रे जप्त केली असून, बँकांनाही डीएसकेंची खाती गोठविण्याचा आदेश दिला आहे.
योग्य ती कारवाई करू शकता-
आधीचा आदेश स्पष्ट असून तुम्ही योग्य ती कारवाई करू शकता, असे निर्देश न्यायालयाने पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले. त्यामुळे आता डीएसके यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.