मुंबई - सर्वप्रथम लोकमतच्या सर्व वाचकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा दसरा हा मोठा सण मानला जातो. नवरात्र संपले की दशमीला दसरा उजाडतो. आश्विन महिन्यातील शुद्ध दशमीस हा सण साजरा करतात. दसरा हा सर्व कार्यांना शुभ मानला जातो. या दिवशी नवे कार्य करण्याची प्रथा आहे. दसऱ्याला विजयादशमी असेदेखील म्हणतात. नऊ दिवस स्त्रीशक्तीचा चालू असलेला उत्सवाचा आजचा शेवटचा दिवस असतो.
दसरा हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळयात पेरलेले पहिले पीक घरात येण्याच्या या वेळी शेतकरी हा उत्सव साजरा करतो. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला. हिंदु पुराणकथांनुसार, दुर्गादेवी आणि महिषासुरामध्ये सुरु असलेलं युध्द संपून देवीने विजय मिळवला, असे मानले जाते. गेली कित्येक वर्ष त्याच विजयाची आठवण म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. तसंच या दिवशी रामाने रावणाचा वध केला आणि चौदा वर्षांच्या वनवासानंतर सीतेसह अयोध्येला परतल्याची कथाही सांगितली जाते. महाराष्ट्रात दस-याच्या दिवशी एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात. या दिवशी सीमोल्लंघन आणि शस्त्रपूजन केले जाते. घरात पंचपक्वान्नं, पुरणपोळ्या आणि इतर गोडा-धोडाचं जेवण केलं जातं. या दिवसाला शुभ मानलं गेल्याने या दिवशी लोकं नवं सोनं किंवा वास्तु किंवा वस्तु खरेदी करतात. कोणत्याही मंगल कार्याचा किंवा नवीन कामाचा श्रीगणेशा करतात. लहान मुलांकडून घरी किंवा शाळांमध्ये पाटीवर सरस्वतीपूजन केलं जातं. कुटूंबांमध्ये आणि मित्र-मैत्रिणींमध्ये शमीच्या झाडांची पानं सोन्याच्या पानांचं प्रतिक म्हणून वाटली जातात.