पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेला अपघात ट्रेलरचालकाच्या लेन कटिंगमुळेच झाला असल्याचा निष्कर्ष पोलिसांच्या चौकशीनंतर काढण्यात आला आहे. त्यानंतर या मार्गावर पोलिसांनी लेन कटिंग करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून, त्याबाबत वाहनचालकांचे प्रबोधनदेखील करण्यात येत आहे.या अपघातानंतर आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अपघाताच्या चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशी अहवालानुसार हा अपघात झाला त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या डाव्या बाजूची एक मार्गिका (लेन क्रमांक ३) ही दरडीच्या कामासाठी म्हणून साधारण एका वर्षापासून बंद आहे. त्यामुळे वाहनांसाठी फक्त दोनच मार्गिका उपलब्ध आहेत.या मार्गावर अर्धवर्तुळाकार वळण आहे. तिथे दिशादर्शक फलक नाहीत. उतार आहे, त्यामुळे वाहन त्याच्या मार्गातून दुभाजक ओलांडून दुसऱ्या रस्त्यावर येते, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. डीएसके यांच्या अपघाताला कारणीभूत असलेला ट्रेलर असाच त्याचा मार्ग सोडून दुभाजक ओलांडून मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या डीएसके यांच्या वाहनाला धडकला.दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी लेन कटिंग करू नये याबाबच वाहनचालकांचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, आतापर्यंत ४८७ चालकांवर लेन बदलली म्हणून कारवाई करण्यात आली, असे पुणे ग्रामीणचे प्रभारी अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे.(प्रतिनिधी)
डीएसकेंचा अपघात लेन कटिंगमुळेच
By admin | Published: June 11, 2016 12:51 AM