राज्यात आलेल्या राजकीय भुकंपाचे दुसरे पर्व लवकरच सुरु होणार आहे. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंविरोधातील उठाव त्यानंतर अजित पवारांनीशरद पवारांविरोधात केलेला उठाव यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे. उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर येत्या ७ ऑगस्टला सुनावणी केली जाणार आहे. याचबरोबर शरद पवार गटाच्या याचिकेवरही सुनावणी घेतली जाणार आहे.
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला अपात्र ठरविण्यासाठी ठाकरे आणि शरद पवार गटाने याचिका दाखल केली होती. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाला पात्र ठरविले होते. याविरोधात ठाकरे-पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. यावर गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी प्रलंबित होती. आता विधानसभा निवडणूक येत असल्याने त्यापूर्वी निकाल लागावा अशी अपेक्षा ठाकरे-पवार गटाने व्यक्त केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय, पक्ष कोणाचा याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला होता. यावर नार्वेकर यांनी चालढकल करत अखेर शिंदे आणि अजित पवारांच्या बाजुने निर्णय दिला होता. याविरोधात ठाकरे शिवसेनेकडून सुनिल प्रभू यांनी याचिका दाखल करत नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान दिले होते. ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशासमोर याबाबतचा मुद्दा मांडला होता व ही याचिका पटलावर घेण्याची विनंती केली होती.
राष्ट्रवादीची सुनावणी सप्टेंबरमध्ये ठेवण्यात आली आहे. तसेच त्या याचिकेला ठाकरेंच्या याचिकेसोबत टॅग करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणात आम्हाला काही स्पष्टतेची गरज आहे. आधीपासून आमची याचिका सहा ऑगस्टसाठी प्रलंबित होती. सोमवारी राष्ट्रवादीची याचिकेवरील सुनावणी सप्टेंबरमध्ये ढकलल्याने आमचीही सप्टेंबरला गेली असल्याचे सिब्बल म्हणाले. यावर चंद्रचूड यांनी दोन्ही याचिकांवर ७ ऑगस्टला सुनावणी करू, असे म्हटले.