आमदारांच्या अपात्रतेवर तारीख पे तारीख; पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला, शिंदेंच्या वकिलांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 05:57 PM2023-09-25T17:57:59+5:302023-09-25T17:58:24+5:30
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: आमदारांच्या अपात्रतेसंबंधित ज्या काही 40 याचिका आल्या आहेत त्या सर्व याचिका एकत्र करा अशी ठाकरे गटाची मागणी आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या अपात्रतेवरील सुनावणी आज पार पडली, परंतू याचिकांवरील सुनावणीला काही मुहूर्त मिळत नाहीय असे चित्र आहे. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून लावून धरण्यात आली आहे. परंतू, विधानसभा अध्यक्षांनी पुढील तारीख दिली आहे.
शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी ही माहिती दिली आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत पुढील सुनावणी होणार आहे. दोन्ही गटांचे वकील आपली बाजू मांडतील. या बाबतची सगळी माहिती १३तारखेला एकत्र होईल. यानंतर सुनावणी एकत्र घ्यायची की वेगवेगळी तो निर्णय देतील, असे ते म्हणाले आहेत.
तर आमदार संजय शिरसाट यांनी देखील माहिती दिली आहे. विधानसभा अध्यक्ष त्यांचा योग्य तो निर्णय देतील. दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली आहे. एक शेड्यूल ठरवून घेण्यासाठी अध्यक्षांनी निर्णय राखून ठेवला आहे. पुढच्या सुनावणीला आपण शेड्यूल वाईज निर्णय देतील. १३ ऑक्टोबरपर्यंत पुढील सुनावणी होईल. विधानसभा अध्यक्ष त्यांच्या शेड्यूलप्रमाणे निर्णय सांगतील, असे शिरसाट म्हणाले आहेत.
आमदारांच्या अपात्रतेसंबंधित ज्या काही 40 याचिका आल्या आहेत त्या सर्व याचिका एकत्र करा अशी आमची मागणी आहे. याचिकांचा विषय एकच असल्याने एकत्रित याचिकावर सुनावणी घेतल्यास या सगळ्या प्रकरणा संदर्भात निर्णय घेण्यास वेळ कमी लागेल आणि तातडीने निर्णय देणे शक्य होऊ शकेल, असे देवदत्त कामत यांनी म्हटले आहे.