Election Commission Press Conference : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. त्यासोबत आचारसंहितेची सुद्धा या पत्रकार परिषदेद्वारे घोषणा करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक केव्हा जाहीर होणार आणि आचारसंहिता केव्हा लागणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता होती. अखेर निवडणूक आयोग दुपारी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यामुळे आजच महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यानंतर दोन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. झारखंडमध्ये एका पेक्षा जास्त टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये शक्यतो एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार आहे. तर झारखंड विधानसभेची मुदत ५ जानेवारी २०२५ रोजी संपणार आहे. त्या आधी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याआधीच २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आणि निकाल पूर्ण होईल, असे सांगितले होते. त्यामुळे आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त निवडणुकीची घोषणा करणार आहेत.
दरम्यान, राज्यातील सर्वच पक्षांनी या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. राज्यात सहा मोठे पक्ष या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेंच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांप्रमाणेच महाराष्ट्रातील जनताही या निवडणुकीकडे बारीक लक्ष ठेवून आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या सातत्याने बैठका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच दोन्ही पक्षांकडून जागा वाटपासंदर्भातही लवकरच घोषणा केली जाणार आहे.