नृसिंहवाडी (कोल्हापूर): येथील दत्त मंदिरात सोमवारी सकाळी दहा वाजता या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा झाला. हजारो भाविकांनी श्री गुरुदेव दत्तच्या गजरात सोहळ्यात स्नानाचा दुपारी एक वाजेपर्यंत लाभ घेतला.गेल्या दोन दिवसांत दमदार पावसामुळे येथील कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांत पंधरा फुटाने त्यात वाढ झाली. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास येथील दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी पोहोचले व सकाळी दहा वाजता दत्त मंदिरात पहिला दक्षिणद्वार सोहळा झाला. दक्षिणद्वार सोहळ्याची माहितीसोशल मीडियातून वाऱ्यासारखी पसरल्याने सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, बेळगाव, आदी अनेक ठिकाणांहून भाविक दर्शन व स्नानासाठी दाखल झाले. सोहळ्याचा आणि स्नानाचा लाभ घेतला. कृष्णा नदीची पाणीपातळी वाढल्याने दुपारी एकच्या सुमारास हा सोहळा समाप्त झाला. नदीचे पाणी वाढले असल्याने भाविकांना दर्शन व स्नान सुरक्षित व्हावे यासाठी येथील दत्त देवसंस्थानच्या वतीने दर्शनरांग व सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करण्यात आली होती. दत्त मंदिरात पाणी आल्याने श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी श्री नारायणस्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे. दरम्यान, तहसीलदार सचिन गिरी यांनी मंदिर परिसरात येऊन नदीच्या वाढत्या पाण्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला.
दक्षिणद्वार सोहळा म्हणजे काय?प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून, दत्त मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहते. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्याने मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णा नदीचे पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून श्रींच्या पादुकांना स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हटले जाते. यावेळी मुख्य मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडण्याऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. त्यामुळे या सोहळ्यात स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.