मुंबई : जगभरातील धावपटूंच्या सहभागामुळे क्रीडा जगतात मानाची असलेल्या ‘मुंबई मॅरेथॉन’मधील छायाचित्रांच्या स्पर्धेत ‘लोकमत’मधील छायाचित्र सर्वोत्कृष्ट ठरले असून त्यासाठी ‘बेस्ट पब्लिश फोटोग्राफ’ या पुरस्काराने ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांना गुरुवारी सन्मानित करण्यात आले. नरिमन पॉइंट येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ‘मुंबई मॅरेथॉन’च्या वतीने करण्यात आले होते. विवेक सिंग आणि अभिनेत्री गुल पनाग यांच्या हस्ते दत्ता खेडेकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.जगभरातील मॅरेथॉनपटूंसाठी आव्हान असलेली ‘मुंबई मॅरेथॉन’ ही स्पर्धा १५ जानेवारी २०१७ रोजी उत्साहात पार पडली. मॅरेथॉन सुरू झाल्यावर पहाटे पावणे सहाच्या सुमारास दत्ता खेडेकर यांनी हे पुरस्कारप्राप्त छायाचित्र टिपले. ‘लोकमत’च्या पहिल्या पानावर हे पुरस्कारप्राप्त छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. (प्रतिनिधी) सूर्योदय होण्यापूर्वी वांद्रे-वरळी सागरी सेतूवर आलेल्या मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंचे हे छायाचित्र आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतू, सहभागी मॅरेथॉनपटू आणि पहाटेच्या संधीप्रकाशात सागरी सेतूवरील दिव्यांच्या झगमगाट यांचे विहंगम दृश्य (एरियल व्ह्यू) दत्ता खेडेकर यांनी कॅमेऱ्यातून टिपले होते.
दत्ता खेडेकर यांचे छायाचित्र ठरले ‘बेस्ट पब्लिश फोटोग्राफ’
By admin | Published: April 07, 2017 5:12 AM