- डिप्पी वांकाणी, मुंबई
मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून दत्तात्रय पडसलगीकर असतील. भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) १९८२ च्या तुकडीचे पडसलगीकर यांच्या नियुक्तीचा आदेश राज्य सरकार ३० जानेवारी रोजी जारी करील. मावळते पोलीस आयुक्त अहमद जावेद यांना शनिवारीच निरोप दिला जाईल. साधारण पंधरवड्यापूर्वी पडसलगीकर यांना गुप्तचर विभागातून (आयबी) पुन्हा महाराष्ट्र केडरमध्ये सामावून घेण्यात आले. ते अहमद यांच्याकडून पदाची सूत्रे स्विकारतील. अहमद जावेद यांची सौदी अरेबियात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली असून दोन आठवड्यांत ते रुजू होतील.पूर्ण नऊ वर्षांनंतर मुंबईत मराठी माणून पोलीस आयुक्तपदी लाभला आहे. डी. एन. जाधव हे २००७ मध्ये पोलीस आयुक्त होते. आयबीमध्ये पडसलगीकर विशेष संचालकपदी कार्यरत होते. त्यांचा आयुक्तपदाचा कार्यकाळ आॅगस्ट २०१८ पर्यंतचा आहे. पडसलगीकरांच्या नियुक्तीचा आदेश शुक्रवारी निघाला नाही तो शनिवारी होईल असे गृह मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. नायगाव पोलीस मैदानावर शनिवारी सकाळी अहमद जावेद यांना समारंभपूर्वक निरोप दिला जाईल. तेथे ते मुंबई पोलीस आयुक्त म्हणून पोलीस दलाची शेवटची भेट घेतील. शुक्रवारी सायंकाळी अहमद यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. सौदी अरेबियामध्ये राजदूत म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल व ती मिळण्यात माझी पोलीस दलातील कामगिरी मदत करणारी ठरल्यामुळे मला माझा सन्मान झाल्यासारखे वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मी सेवेत असताना केवळ एक रूपया वेतन घेतल्याचे जी आख्यायिका सांगितली जाते ती खरी नसून मी सेवेत असताना सरकारकडून ‘रास्त’ वेतन घेतल्याचे त्यांनी सांगितले.नवी जबाबदारी ही मोठी असून देशाचे प्रतिनिधित्व करताना मला माझा गौरव झाला आहे, असे वाटते. मी नवी जबाबदारी पार पाडण्यासाठी मी माझ्यातील सर्वोत्तम देईन, असेही अहमद जावेद म्हणाले. देशातील फार मोजक्या आयपीएस अधिकाऱ्यांना राजदूत म्हणून काम करण्याची संधी मिळाली असताना तुमची भावना काय आहे, असे विचारता ते म्हणाले की,‘‘माझा पोलीस दलातील ३६ वर्षांचा अनुभव नव्या जबाबदारीला पूरकच ठरेल.