- सीमा महांगडेमुंबई : जागतिक कौशल्य स्पर्धेत १ सुवर्ण, १ रजत आणि २ कांस्य पदकांसह भारताने १३ वे स्थान पटकावले. विशेष उल्लेखनीय म्हणजे या स्पर्धेतील ग्राफिक डिझायनिंग या स्पर्धेत ५० पैकी ४९ गुण मिळवत कांस्य पदक मिळवणारी श्वेता रतनपुरा ही महाराष्टÑाची कन्या आहे.दर दोन वर्षांनी जागतिक स्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा रशियातील कझान येथे २२ ते २७ आॅगस्ट दरम्यान ४५ वी जागतिक कौशल्य स्पर्धा पार पडली. ६० देशांच्या विविध ५६ कौशल्य स्पर्धांमध्ये तब्बल १६०० तरुण सहभागी झाले होते. यात मोबाइल रोबोटिक्स, प्रोटोटाइप मॉडेलिंग, हेअरड्रेसिंग, बेकिंग, कन्फेक्शनरी आणि पॅटीसेरी, वेल्डिंग, कार पेंटिंग, फ्लोरिस्ट्री आदी कौशल्यांचा समावेश होता. यातील ४४ कौशल्य स्पर्धांमध्ये ४८ स्पर्धकांनी भारताचे नेतृत्व केले. यामधील वॉटर टेक्नॉलॉजी स्पर्धेत भारताला सुवर्ण, वेब टेक्नॉलॉजीत रजत तर ग्राफिक डिझायनिंग व ज्वेलरी स्पर्धेत कांस्य पदक मिळाले. वेब डिझायनिंगमध्ये कांस्य पदक पटकावणारी श्वेता १८ वर्षांपासून महाराष्टÑात, पुणे येथे राहते. तर भारताचे प्रतिनिधित्व करत पदकांचे मानकरी ठरलेले इतर विद्यार्थी ओरिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटकचे आहेत.नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन, अहमदाबादची विद्यार्थिनी असलेल्या श्वेताने सांगितले की, पदवी घेऊनही केवळ आपल्या देशासाठी ही स्पर्धा जिंकायची या एकमेव ध्येयाने नोकरी न करता संपूर्ण वेळ स्पर्धेची तयारी करण्याचा निर्णय तिने घेतला. वर्षभरापासून या स्पर्धेची तयारी करत होते. इंडिया स्किल्स स्पर्धा सुरू झाल्यापासून महाविद्यालय, विभागीय, राज्य आणि त्यानंतर देशपताळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होत अखेर ग्राफिक डिझायनिंग गटात जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळाली, असे श्वेताने सांगितले. स्पर्धेत कोणत्याही राज्याची प्रतिनिधी म्हणून गेले नव्हते तर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले होते. स्टेजवर उभे राहून भारताचा तिरंगा उंचावत भारताची प्रतिनिधी म्हणून कांस्य पदक स्वीकारणे हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा क्षण होता, असे श्वेताने सांगितले.महाराष्टÑाच्या शिरपेचात मानाचा तुरायापूर्वी भारतात झालेल्या स्किल इंडिया स्पर्धेत २३ पदकांची कमाई करत महाराष्टÑाने पहिले स्थान पटकावले होते. या स्पर्धेत श्वेतानेही कांस्य पदकाची कमाई करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यामुळे जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी भारतातून निवड करण्यात आलेल्या ४८ स्पर्धकांपैकी श्वेतासह तब्बल ७ विद्यार्थी हे महाराष्टÑातील होते.राज्याच्या आयटीआयसाठी अभिमानाची गोष्टभारताला मिळालेले हे यश महाराष्ट्रातील आयटीआयसाठी अभिमानाची गोष्ट असून इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे आहे. आयटीआयच्या पुढील प्रगतीसाठी आम्ही अनेक कंपन्यांसोबत आणि राज्य सरकारसोबत टायअप करून अधिकाधिक अद्ययावत होण्याच्या प्रयत्नात आहोत. यामुळे शासकीय शैक्षणिक संस्थांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल अशी अपेक्षा आहे.- दीपेंद्र सिंह कुशवाह, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
ग्राफिक डिझायनिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या कन्येची जागतिक भरारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 5:50 AM