धुळे : नवरीच्या भावाला दिला जाणारा ‘सुक्या’ होण्याचा मान चक्क नवरीच्या लहान बहिणीला रविवारी नगाव येथे देण्यात आला. त्याद्वारे बच्छाव आणि कुंवर कुटुंबाने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला़ होळ येथील शेतकरी शशिकांत शिवराम पाटील यांची कन्या मानसीचा विवाह शिंगावे येथील छोटू वामन कुंवर यांचा मुलगा भुपेंद्र यांच्याशी रविवारी झाला़नवरदेवाला घेण्यासाठी नवरी मुलीचा भाऊ ‘सुक्या’ म्हणून घोड्यावर बसून जातो़ जर नवरीला भाऊ नसेल, तर चुलत किंवा मावसभावाला हा मान मिळतो़ मात्र, नवरीची लहान बहीण प्रियंका ही सुक्या म्हणून गेली़ विशेष म्हणजे नवरीने स्वत: आपल्या लहान बहिणीचे औक्षण केले़ सुक्याची भूमिका प्रियंका बजावेल, असे आधीच ठरल्याचे वधुपिता शशिकांत बच्छाव यांनी सांगितले. सुक्या बनून लग्नात घोड्यावर बसलेल्या प्रियंकाची गावातून मिरवणूक काढण्यात आली़ थेट मारुती मंदिराच्या पारापर्यंत जाऊन मुलीला अशुभ मानणाऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण करण्यात आला़ लग्न मुहूर्त बाजूला सारून वधू पित्याने ‘लेक वाचवा’ अभियानावर भाष्य केले. (प्रतिनिधी)
रूढींना फाटा देत वधूच्या बहिणीला ‘सुक्या’चा मान!
By admin | Published: February 06, 2017 2:23 AM