दौंड- दौंड तालुक्यातील मुळा-मुठा आणि भीमा नद्यांच्या पात्रातून कोट्यवधी रुपयांची वाळू चोरीला गेली असल्याची वस्तुस्थिती असून, रोज लाखो रुपयांची वाळूचोरी होत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी होत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी राजेगाव, वाटलूज, राहू या ठिकाणी वाळूचे लिलाव झालेले आहेत. या ठिकाणी शासनाला महसूल भरून वाळू काढली जाते; परंतु ही वाळू काढताना शासनाचे नियम धाब्यावर बसवून बेसुमार वाळूउपसा केला जातो. वास्तविक पाहता, सूर्यास्तानंतर वाळू काढण्यासाठी परवानगी नाही, तरीदेखील रात्री नदीपात्रात दिवे लावून वाळू काढण्याचा प्रकार अधिकृत ठेका घेतलेले ठेकेदार तसेच वाळूचोर करीत असतात. रात्रीच्या वेळी ग्रामीण भागातून तसेच दौंड शहरातून क्षमतेपेक्षा जास्त वाळूने भरलेले ट्रक मार्गस्थ होतात. मात्र, याकडे शासन डोळेझाक करते. रात्री महसूल खात्याने वाळूचे ट्रक अडवून त्यावर कारवाई केली, तर सूर्यास्तानंतरचा वाळू उपसा कमी होण्यास मदत होईल. शासनाने दिलेल्या अधिकृत वाळू ठेक्याच्या व्यतिरिक्त भीमा आणि मुळा-मुठा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरू आहे. साधारणत: एक ट्रक वाळू पुण्याला नेली, तर २० हजारांच्या जवळपास व दौंड शहर आणि तालुक्यात १४ हजार रुपये मिळतात. त्यानुसार प्रत्येक वाळूचोर नदीपात्रातून किमान दररोज ४ ते ५ ट्रक भरून वाळूचोरी करतो. त्याअनुषंगाने मोठ्या प्रमाणावर वाळूचोर असल्यामुळे साधारणत: तालुक्यातून दररोज २५ ते ३० ट्रक भरून लाखो रुपयांची वाळूची चोरी होत आहे. तेव्हा शासनाने रात्रीची गस्त वाढवून पोलिसांच्या मदतीने वाळूचोरांवर कारवाई करावी; जेणेकरून रात्रीच्या वाळूचोरीला आळा बसेल.सीसी टीव्हीत जेरबंद होत आहेत वाळूचे ट्रकदेऊळगावराजा, शिरापूर, वडगाव दरेकर खोरवडी, हिंगणीबेर्डी या भागातून रात्रीच्या वेळी वाळू चोरली जाते. वाळूने भरलेले सर्व ट्रक दौंड शहरातून छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याच्या परिसरातून मार्गस्थ होतात. या पुतळ्याच्या परिसरात सुमारे ७ सीसी टीव्ही बसविण्यात आले आहेत. तेव्हा दिवसभरात कुठला वाळूचा ट्रक जातो, त्या ट्रकच्या क्रमांकासह फुटेज या सीसी टीव्हीत जेरबंद झालेले आहे. तेव्हा शासनाने सदरचे फुटेज घेऊन रात्री कुठले ट्रक गेले, त्यांच्यावर कारवाई करावी. कारण, या रस्त्यावरून जाण्याशिवाय ट्रकचालकांना पर्याय नाही. याला पर्यायी म्हणून दुसरा रस्ता तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यापासून असल्याने या रस्त्यावरून वाळूचोर जात नाहीत. त्यामुळे शिवाजी चौकातील सीसी टीव्हीद्वारे शासन वाळूचे ट्रक पकडू शकतात.आता गोण्यातून वाळूतस्करीवाळूचोरीचे ट्रक पकडले जातात म्हणून काही वाळूचोरांनी आगळीवेगळी शक्कल लढवली असून, चोरलेली ओली वाळू सर्रास नदीकाठी वाळवली जाते आणि नंतर ती गोण्यांमध्ये भरून या गोण्या ट्रकमधून नेल्या जातात. त्यामुळे ट्रकमधून चोरीची वाळू चालली आहे, याचीदेखील महसूल खात्याला कल्पना येत नाही आणि वाळूची तस्करी सोयीस्कररीत्या केली जाते.
दौंड तालुक्यात कोट्यवधी रुपयांची वाळूतस्करी
By admin | Published: May 10, 2014 7:41 PM