ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी दहशतवाद्यांइतकाच या बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या अमेरिकेच्या डेव्हिड हेडलीला आरोपी बनवण्यात आले असून आज होणा-या सुनावणीदरम्यान त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात येणार आहे.
२६/११ च्या कटातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला सय्यद झबिउद्दीन अन्सारी उर्फ अबु जुंदाल याच्यावर सध्या सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. त्याच्याबरोबर डेव्हिड हेडलीलाही न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात यावे, अशी विनंती मुंबई पोलिसांनी न्यायाधीशांना गेल्या महिन्यात केली होती. २६/११च्या हल्ल्यात हात असल्याने अमेरिकेच्या न्यायालयाने हेडलीला ३५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायालयाचे न्या. जी. ए. सानप यांनी बुधवारी अमेरिकेच्या संबंधित प्रशासनाला समन्स बजावत त्याला न्यायालयात व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याची सुनावणी होणार आहे.