मुंबई : अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील तीन जंगम मालमत्तेवर पुन्हा एकदा बोली लावली जाणार आहे. भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीट परिसरातील येथील सदनिका व हॉटेल अफरोजाच्या खरेदीसाठी इच्छुकांना आवाहन करण्यात आले असून १४ नोव्हेंबरला हा लिलाव होणार आहे.केंद्र सरकारच्या वतीने एका खासगी कंपनीकडून हा व्यवहार करण्यात येणार आहे. सुमारे दोन वर्षापूर्वी हॉटेलचा लिलाव करण्यात आला होता. मात्र ती खरेदी करण्याची तयारी दाखविलेल्या स्वयंसेवी संस्थेला ती निर्धारित मुदतीमध्ये रक्कम भरता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बोली लावली जाणार आहे. ठाणे पोलिसांनी महिन्याभरापूर्वी दाऊदचा भाऊ इकबाल कासकर अटकेत असल्यामुळे यावेळी इच्छुकांच्या संख्येत वाढ होईल, या शक्यतेने लिलाव जाहीर करण्यात आल्याचे कंपनीतील अधिका-यांकडून सांगण्यात आले.१९९३च्या बॉम्बस्फोटानंतर भारतातून फरारी झालेल्या दाऊदच्या देशभरातील मालमत्ता केंद्राने जप्त केल्या आहेत. मात्र दहशतीमुळे त्या खरेदी करण्यामध्ये कोणी स्वारस्थ दाखवित नसल्याने बहुतांश स्थावर मालमत्ता पडून असल्याची परिस्थिती आहे.आता आयकर विभागाच्यावतीने अश्विन अॅण्ड कंपनी अक्युशनर्स या खासगी कंपनीद्वारे पाच मालमत्तेच्या लिलावासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली आहे. त्यापैकी तीन प्रॉपर्टी या मुंबईतील आहेत. पाकमोडिया स्ट्रीटवरील डांबरवाला बिल्डिंगमधील खोली क्रमांक १८,१९,२०, २५, २६ व २८ या खोल्या, तसेच याकुब स्ट्रीटवरील शबनम गेस्ट हाऊस आणि हॉटेल रौनक अफरोज (दिल्ली जायका) या मालमत्तेचा समावेश आहे. या बिल्डीगमधील काही खोल्या या दाऊदचा भाऊ इकबाल कासकर व बहिण हसीना पारकर याच्या मालकीच्या आहेत. हसीनाच्या मृत्यूनंतर तिची मुले या ठिकाणी राहतात. गेल्या महिन्यात ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने इकबाल कासकरला याच बिल्डिंगमधून अटक केली होती.--------------------------दाऊदच्या देशभरातील विविध मालमत्तेसाठी यापूर्वी गेल्या काही वर्षात आतापर्यंत चार वेळा बोली लावण्यात आली आहे. मात्र त्याच्या दहशतीमुळे स्थावर प्रॉपर्टी घेण्यासाठी फारसे कोणी उत्सुक नव्हते. यापूर्वी ९ डिसेंबर २०१५ रोजी झालेल्या लिलावावेळी दाऊदचा कधी काळी अड्डा समजल्या जाणा-या हॉटेल अफरोज हे ज्येष्ठ पत्रकार व देशसेवा स्वयंसेवी संस्थेचे चालक एस.बालाकृष्णन यांनी सर्वाधिक ४ कोटी २८ लाखाची बोली लावीत ती जिंकली. त्यासाठी ३० लाख रुपये अनामत रक्कमही भरली. मात्र उर्वरित रक्कम महिन्याभरात भरू न शकल्याने खरेदीचा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. दरम्यान, बालकृष्णन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपण रकमेची पूर्तता करण्यासाठी आणखी महिन्याभराची मुदत मागितली होती, मात्र कंपनीने त्याला नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. लिलावाच्या कालावधीत बालाकृष्णन यांना धमक्याही देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेने दाऊदच्या टोळीतील अब्बासला अटक केली होती.-----------------दाऊद फरारी असला तरी त्याच्या टोळीची दहशत कायम असल्याने त्याची प्रॉपर्टी कोणी खरेदी करीत नसल्याची परिस्थिती आहे. मात्र आता दाऊदची बहीण हसीना पारकरचे निधन तसेच भाऊ इकबाल हा पोलिसांच्या ताब्यात असल्याने यावेळी इच्छुकांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दाऊदच्या मुंबईतील प्रॉपर्टीवर पुन्हा लागणार बोली, 14 नोव्हेंबरला होणार पुन्हा लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 8:00 PM