ठाणे, दि. 18 - कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाणे गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. एका खंडणी प्रकरणामध्ये इक्बाल कासकरला अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकरने एका बिल्डरकडे खंडणी मागितली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. इक्बाल कासकरकडून खंडणी मागण्यात आल्याची तक्रार मिळाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत इक्बाल कासकर याला अटक केली. ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी त्याला राहत्या घरातून अटक केली.मात्र मिळत असलेल्या माहितीनुसार इक्बाल कासकरने एका बिल्डरकडून चार फ्लॅट मिळवले होते. मात्र इक्बाल अजून फ्लॅटची मागणी करत होता. अखेर त्याच्याविरोधात मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान इक्बाल याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कासकर याने ठाण्यातील बिल्डर खेतवानी यांच्याकडून खंडणीपोटी चार सदनिका वसूल केल्या होत्या. मात्र, त्याची भूक काही कमी न झाल्याने व तो आणखी सदनिकांची मागणी करत असल्याने बिल्डरने कासारवडवली पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, शर्मा यांनी भायखळा येथील कासकरच्या घरी तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली.
खेतवानी यांनी ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गृहप्रकल्प उभारला होता. या प्रकल्पाच्या जागेसंदर्भात वाद होता. या वादातूनच खेतवानी यांना खंडणी मागण्यात आली होती. सोमवारी खेतवानी यांनी तक्रार दिल्यानंतर ठाणे पोलिसांनी कारवाई केली. कासकरला त्याच्या भायखळा येथील निवासस्थानातून अटक करण्यासाठी तब्बल 40 पोलीस, 8 कमांडो आणि बुलेटप्रुफ गाड्यांचा ताफा पोलिसांनी वापरला.
कासकर हा 2003 पर्यंत दुबईत वास्तव्य करीत होता. 19 मार्च 2003 रोजी त्याला विमानतळावर अटक करून त्याला मोक्का लावण्यात आला. दाऊदचे रिअल इस्टेटमधील व्यवहार सांभाळणा-या कासकरची 2007 मध्ये वेगवेगळ्या आरोपांतून पुराव्याअभावी मुक्तता झाली. 2010 मध्ये छोटा राजन टोळीने त्याच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, तो पोलिसांनी उधळून लावला. भेंडीबाजार येथील पाकमोडिया स्ट्रीटवरील हुसैनी इमारत कोसळल्यानंतर भायखळा येथील डाबरवाला ही धोकादायक इमारत रिकामी करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले होते. त्यातच इमारतीत कासकर हा बेकायदा राहत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
इक्बालला अटक करणारे चकमक फेम अधिकारी म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा गेल्या महिन्यात पुन्हा एकदा पोलिस सेवेत रूजू झाले होते. त्यानंतर त्यांच्याकडे खंडणीविरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली होती. 1983 साली महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रूजू झालेल्या प्रदीप शर्माची कारकीर्द माहिम पोलीस ठाण्यापासून सुरू झाली. शंभरपेक्षा जास्त गुन्हेगारांना चकमकीत ठार केल्याने शर्माची ओळख सर्वदूर पोहोचली होती. गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याच्या आरोपाखाली 2008 साली त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. या आरोपातून दोषमुक्त झाल्यानंतर 2009 साली ते पुन्हा सेवेत रूजू झाले. जानेवारी 2010 मध्ये लखनभैय्या बनावट चकमक प्रकरणामध्ये शर्मासह 13 पोलिसांना अटक करण्यात आली होती. जुलै 2013 मध्ये न्यायालयाने त्यांना या प्रकरणातूनही दोषमुक्त केले होते.