Dawood Ibrahim :उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला 23 वर्षांनंतर आपल्या दुकानाचे मालकी हक्क मिळाले आहेत. इतक्या वर्षांनंतर दुकानाची मालकी मिळाल्यामुळे या प्रकरणाची सध्या चर्चा सुरू आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या दुकानात विशेष काय आहे? तर हे दुकान मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे होते. आयकर विभागाने या दुकानाचा लिलाव केला, तेव्हा फिरोजाबाद येथील रहिवासी असलेल्या हेमंत जैन यांनी दुकान खरेदी केले होते. आता प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर त्यांना या दुकानाचे मालकी हक्क मिळाले.
सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील जयराज भाई मार्गावर 144 स्क्वेअर फुटांचे दुकान आहे. या दुकानाची मालकी डॉन दाऊदच्या नावावर होती. दाऊद भारतातून पळून गेल्यानंतर प्रशासनाने त्याची बहुतांश मालमत्ता ताब्यात घेतली. यानंतर, 20 सप्टेंबर 2001 रोजी आयकर विभागाने या दुकानाचा लिलाव केला. त्यावेळी हेमंत जैन आणि त्यांचा मोठा भाऊ पियुष जैन यांनी दोन लाख रुपयांना दुकान विकत घेतले. हे दुकान खरेदी केल्यानंतर मालकी हक्क मिळण्यास 23 वर्षे लागली.
हेमंत यांनी याबाबत सांगितले की, लिलावात दुकान खरेदी केल्यानंतर त्यांना मालकी हक्कासाठी बराच काळ संघर्ष करावा लागला. दुकानाच्या मालकीसाठी आयकर विभागाचे अधिकारीही त्यांना सहकार्य करत नव्हते. यानंतर अनेक वर्षे हेमंत मालकी हक्कासाठी लढत राहिले. विशेष म्हणजे, 2017 साली लिलावाशी संबंधित फाइल निबंधक कार्यालयातून गायब झाली होती. यानंतर त्यांनी पीएमओला अनेक पत्रेही लिहिली.
हेमंत यांनी या प्रकरणाबाबत न्यायालयात धाव घेतली. अखेर पाच वर्षे धावपळ केल्यानंतर 19 सप्टेंबर 2024 रोजी दुकान त्यांच्या नावावर झाले. सध्या या दुकानावर दाऊद इब्राहिमच्या गुंडांनी कब्जा केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हेमंत यांनी दुकान ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.