ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - दाऊदच्या कराचीतील दूरध्वनीवरून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह देशातील पाच जणांच्या मोबाइलवर कॉल येऊन झालेल्या कथित संभाषणाची माहिती समोर आणणाऱ्या मनीष भंगाळे या हॅकरला अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली आहे.
दाऊद इब्राहिमचे कॉल मंनीष भंगाळे या इथिकल हॅकर्सने ट्रेस केल्याचा दावा केला. दाऊदच्या कॉल लिस्टमध्ये १० भारतीय नंबर होते, त्यापैकी एक नंबर एकनाथ खडसेंचा असल्याचा दावा "आप" नेत्या प्रीती मेनन यांनी केला. मंनीष भंगाळेनेच २०१४ ते २०१५ दरम्यान हॅकिंग करुन दाऊदने कुणा-कुणाला कॉल केले होते, याची माहिती बाहेर आणली होती. त्यात एक फोन नंबर खडसेंचा असल्याचेही त्याने दावा केला होता.
काय आहे प्रकरण -
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबीन हिच्या नावे असलेल्या दूरध्वनीवरून एकनाथ खडसेंना फोन आले होते, असा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केला होता. मेनन यांचे हे आरोप माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावले. मात्र आपल्या आरोपांचा पुनरुच्चार करताना प्रीती मेनन यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत खडसे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. मेनन यांनी आरोप केले असले तरी तशी तक्रार आपणाकडे केलेली नाही, असे जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.
दाऊदच्या कराची येथील पत्त्यावर नमूद असलेल्या चार विविध दूरध्वनी क्रमांकांवरून ५ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या काळात खडसे यांना कॉल आले, असा आरोप करताना प्रीती मेनन यांनी संबंधित कागदपत्रांचा हवाला दिला आणि खडसे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही मेनन यांनी केली. मनीष लीलाधर भंगाळे या जळगावच्या तरुणाने पाकिस्तानी दूरसंचार कंपनीचे संकेतस्थळ हॅक करून ही माहिती काढल्याचे त्यांनी सांगितले.
हॅकिंगच्या माध्यमातून ५ सप्टेंबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या कालावधीत ही माहिती काढण्यात आली. त्यानुसार, या प्रकरणात ५ पाच भारतीय क्रमांकांचा समावेश असल्याची माहिती उघडकीस आली. त्यात महाराष्ट्रातील महसूल मंत्री खडसे यांच्या मोबाइल क्रमांकाच्या समावेश आहे. याप्रकरणी, अधिक चौकशी करण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचे प्रीती मेनन यांनी सांगितले. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत खडसे यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी मेनन यांनी केली.
विशेष म्हणजे प्रीती मेनन यांची पत्रकार परिषद संपताच मनीष भंगाळे याने त्याच ठिकाणी पत्रकार परिषद घेत खडसे यांना दाऊदच्या घरातून फोन केले गेले असा आरोप केला. कोणत्याही राजकीय पक्षाशी आपला संबंध नसल्याने मी स्वतंत्रपणे माहिती देत असून मला याबाबत अनेकांकडून ऑफर आल्या तसेच ठार मारण्याच्या धमक्या आल्या आहेत, असे भंगाळे याने सांगितले.तर हॅकिंग प्रक्रियेत आयडिया कंपनी, पाकिस्तान टेलिकॉम कंपनीच्या डेटातून या कॉलची माहिती मिळाली. शिवाय, याकरिता खास दोन-तीनवेळा दुबईला जाऊन आलो, असेही भंगाळे याने सांगितले.
मोबाइल क्रमांक वापरात नाही - खडसे
आरोप फेटाळताना खडसे म्हणाले, ९४२३०७३६६७ या आपल्या मोबाइल क्रमांकाचा उल्लेख केला आहे, तो गेल्या एक वर्षापासून वापरात नाही. या क्रमांकावर या काळात आंतरराष्ट्रीय कॉल आलेला नाही किंवा त्यावरून कॉल परदेशात केलेला नाही. संबंधित कंपनीने तसे लेखी कळवले आहे. हा मोबाइल क्रमांक क्लोन करून तो वापरला गेला असण्याची शक्यता आहे. याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी मीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पाकमधील या क्रमांकावरून खडसेंना फोन ?
दाऊदच्या पत्नीच्या नावे असलेल्या विविध दूरध्वनी क्रमांकांवरून खडसे यांच्या नावे असलेल्या मोबाइलवर संपर्क साधण्यात आल्याचा आरोप आहे. ते दूरध्वनी क्रमांक असे : ०२१-३५८७१६३९, ०२१-३५८७१७१९, ०२१-३५८७१८३९, ०२१-३५३६०३६०