मुंबई, दि. 24 - नुकताच अटक करण्यात आलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने प्राथमिक चौकशीमध्ये आपला भाऊ दाऊद इब्राहीमशी संपर्क नसल्याचे सांगितले होते. मात्र आता त्याने दाऊद इब्राहीमसोबत फोनवरून संपर्क साधल्याचे मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही भावांमी बर्नर फोनच्या मदतीने एकमेकांशी संपर्क साधल्याचे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. इक्बाल कासकरला ठाण्यातील एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान, कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम आणि इक्बाल कासकर हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. दोन्ही भावांमध्ये शेवटचे संभाषण भेंडीबाजार येथील हुसैनी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर झाले होते. या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारीच इक्बाल कासकरचे घर आहे. मात्र त्याने सांगितेल्या माहितीमध्ये कितपत तथ्य आहे याबाबत तपासानंतरच माहिती मिळू शकेल असे, पोलिसांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कासकरने बर्नर फोन आणि सिम बॉक्सच्या मदतीने दाऊदशी संपर्क साधला होता. बर्नर फोन विशेष कामांसाठी तयार केले जातात. हे फोन काम पूर्ण झाल्यानंतर नष्ट केले जातात. तसेच सिमबॉक्स कॉलमुळे ओळख लपवण्यास मदत होते. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी दोन वर्षांपूर्वी चार वेळा बोलणे झाल्याचा दावा करणा-या इक्बाल कासकर याने आपण व्यसनाधीन असल्याने दाऊद आपल्यावर नाराज असल्याची माहिती शनिवारी पोलिसांना दिली होती. खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या कासकरच्या बँक अकाउंटबद्दल चौकशी केली असता आपले बँक अकाउंटच नसल्याची लोणकढी थापही त्याने मारली होती.बिल्डरकडून खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात अटकेत असलेला कासकर दररोज उलटसुलट दावे करत असून पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. इक्बालने आपला भंगारचा धंदा असल्याचे सांगितले. तसेच तो राहत असलेल्या परिसरात त्याचा एक दुकानाचा गाळा असून त्याने तो भाड्याने दिला आहे. महिनाकाठी त्याचे ३० ते ४० हजार रुपये भाडे येते. त्यावरच आपला उदरनिर्वाह सुरू असल्याचा हास्यास्पद दावा त्याने केला आहे. आपल्याला वेगवेगळी व्यसने असून त्यामुळे दाऊद आपल्यावर नाराज असल्याचे त्याचे म्हणणे आहे. दाऊदबद्दल दररोज नवनवी तसेच परस्परविरोधी माहिती देऊन पोलिसांना गोंधळात टाकण्याची सराईत गुन्हेगाराची कार्यशैली कासकरने अवलंबली आहे.
बर्नर फोन म्हणजे नेमकं काय-
- हे फोन खास संभाषणासाठी तयार केले जातात.
-त्याचा एकदा वापर झाला की ते नष्ट केले जातात
- फोन करणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यासाठी 'सिम बॉक्स'ची वापर केला जातो.
-व्हाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलच्या साहाय्याने कॉल करण्यासाठी सिम बॉक्सचा वापर केला जातो
-त्यामुळे सुरक्षा संस्थांना ते टॅप करता येत नाहीत