मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मोठी बहीण हसिना पारकर ऊर्फ हसिना आपा (५६) हिचे आज सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. तिच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर नागपाड्यातील गॉर्डन हाउसमधील निवासस्थानी नातेवाईक, परिचितांची मोठी गर्दी झाली होती. रात्री उशिरा तिच्यावर चर्नी रोड येथील बडा कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार झाले. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. खंडणी, अपहरण, धमक्यांबाबत विविध गुन्हे दाखल असलेली हसिना ही दाऊद भारतातून फरारी झाल्यापासून डी गँगची मुंबईतील सूत्रे चालवित होती. तिच्या मृत्यूमुळे दाऊद टोळीच्या साम्राज्याला मोठा हादरा बसला असल्याचे समजले जात आहे. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हसिनाच्या छातीत दुखू लागल्याने परिसरातील हबीब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचे निधन झाले. या वेळी तिचा भाऊ इकबाल कासकर, मुलगा अलिशा कासकर उपस्थित होते. निधनाचे वृत्त समजल्यावर तिच्या दोन विवाहित मुली, मित्रमंडळी, रत्नागिरीतील नातेवाइकांनी निवासस्थानी गर्दी केली.दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सुरुवातीपासून सक्रिय असलेल्या हसिना पारकरचा पती इस्माईलला १९९१ साली अरुण गवळी टोळीच्या गुंडांनी गोळ्या घालून ठार केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी पुढच्याच वर्षी डी गँगकडून जे.जे. हॉस्पिटलमध्ये हत्याकांड घडवून आणले होते. मुंबईतील बॉम्बस्फोटांनंतर फरारी झालेल्या दाऊदच्या मुंबई आणि परदेशातील गुन्हेगारीची सूत्रे हसिना आपा चालवित होती. हवाला रॅकेटचा कारभार ती सांभाळत होती. ‘लेडी डॉन’, ‘सिस्टर आॅफ डी’ या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या हसिनाचा मोठा २३ वर्षांचा मुलगा दानिश पारकरचा २००६मध्ये मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात मृत्यू झाला होता. विरोधी टोळीकडून हा अपघात घडवून आणल्याची शक्यता व्यक्त होत होती. हसिनावर एसआरएतील लाभार्थ्यांना धमकाविणे, अपहरण, बॉलीवूडमधील मंडळींना खंडणीसाठी धमकाविण्याबाबत अनेक पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल होत्या. तिच्यावर अटकेची कारवाई झाली होती. (प्रतिनिधी)
दाऊदची बहीण हसिना आपाचे निधन
By admin | Published: July 07, 2014 3:58 AM