ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंटला बांगलादेश सरकारने भारताकडे सोपवलं आहे. मर्चंटला बांगलादेशच्या सीमेवर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे सुपूर्द करण्यात आलं. बीएसएफ जवानांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आज सकाळच्या विमानाने क्राईम ब्रांचचे अधिकारी मर्चंटला घेऊन मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत उतरताच त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं जाणार असून त्यानंतर पोलिस कोठडीत त्याची चौकशी केली जाईल. मुंबई क्राईम ब्रांचच्या 4 अधिका-यांचं पथक मर्चंटचा ताबा घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालला रवाना झालं होतं.
दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार म्हणून ओळखल्या जाणा-या अब्दुल रौफला 2009 मध्ये बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली होती. बांगलादेशमध्ये अवैधरित्या घुसखोरी करणे आणि बनावट पासपोर्टप्रकरणी रौफला पोलिसांनी अटक केली होती. त्याला रविवारी संध्याकाळी चार वाजता तुरुंगातून सोडण्यात आले.
टी सीरिज या म्युझिक कंपनीचे मालक आणि संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येतील तो मुख्य आरोपी आहे. 12 ऑगस्ट 1997 रोजी अंधेरी पश्चिम येथील एका मंदिराबाहेर तीन हल्लेखोरांनी गुलशनकुमार यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करीत त्यांची हत्या केली होती. 2002 मध्ये मुंबईतील न्यायालयाने गुलशनकुमार यांच्या हत्येप्रकरणी दाऊद मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र तेव्हापासून रौफ पसार झाला होता.