साडेतीन दिवसांच्या सरकारचा 'तो' गाजलेला शपथविधी; दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी झाला होता राजकीय भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 11:19 AM2021-11-23T11:19:52+5:302021-11-23T12:12:46+5:30

दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथ घेऊन अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं.

On this day in 2019 Devendra Fadnavis and Ajit Pawar took Oath and formed government, What exactly happened on that day ? | साडेतीन दिवसांच्या सरकारचा 'तो' गाजलेला शपथविधी; दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी झाला होता राजकीय भूकंप

साडेतीन दिवसांच्या सरकारचा 'तो' गाजलेला शपथविधी; दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी झाला होता राजकीय भूकंप

googlenewsNext

मुंबई: दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबर २०१९ ला भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथ घेऊन अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. त्या ऐतिहासिक शपथविधीला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती आणि दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसले होते. निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस झाले तरी सरकार स्थापन होत नव्हतं. अखेर देंवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र येत पहाटे शपथविधी केला आणि सरकार स्थापन केलं. पण, ते सरकार जास्तकाळ टिकू शकलं नाही आणि अवघ्या साडेतीन दिवसात सरकार कोसळलं. तेव्हा नेमकं काय झालं होतं ? अजित पवार आणि फडणवीसांना एकत्र येऊन गुपचूप शपथविधी का घ्यावा लागला ? या प्रश्नांची उत्तरे अजूनही कुणाला माहित नाही. या दोन्ही नेत्यांना अनेकवेळा त्यावर विचारण्यात आलं, पण त्यांनी त्यावर बोलणं टाळलं.

विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटली...

विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. भाजप १०५ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष बनला होता. शिवसेना-भाजप युतीत लढले पण मुख्यमंत्रिपदावरुन सारं घोडं अडलं. निकाल दिवाळीपूर्वी लागला पण सत्ता काही स्थापन होईना. अख्खी दिवाळी गेली पण शिवसेना-भाजपत मुख्यमंत्रिपदावरुन कलगीतुरा सुरुच होता. अमित शहांसोबत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं बोलणं मातोश्रीच्या बंद खोलीत झालं होतं असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं. पण, फडणवीसांना मात्र हे मान्य नव्हतं. मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटत नव्हता. भाजप शिवसेनेसोबत जाणार नाही, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करेल अशा चर्चा सुरू झाल्या. संजय राऊतही दररोज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका करत होते. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार असं वातावरण त्यानंतर तयार झालं होतं, अशात आला २३ नोव्हेंबरचा तो दिवस.

२३ नोव्हेंबर २०१९ च्या सकाळी काय घडलं ?

२३ नोव्हेंबर २०१९ ला जे घडलं ते यापूर्वी महाराष्ट्रात कधीच घडलं नव्हतं, ती सकाळ एका ब्रेकिंग बातमीने उजाडली. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अचानक पहाटे पहाटे राजभवनात जाऊन शपथविधी उरकला होता. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा केला आणि भल्या पहाटे राजभवानावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, अजित पवारही उपमुख्यमंत्री झाले. भाजपला बहुमतासाठी ३९-४० आमदार कमी पडत होते. पण, ज्या आमदारांच्या भरोशावर अजित पवार फडणवीसांसोबत आले होते, त्या आमदारांनी ऐनवेळी अजित पवारांच्या विरोधात आणि पक्षाच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर अवघ्या साडेतीन दिवसातच हे सरकार पडलं. 

त्या दिवशी अनेक आमदार नॉट रिचेबल...

२३ नोव्हेंबरच्या पहाटे पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी राजभवनावर पार पडला. कुणी कल्पनाही करु शकणार नाही अशी गोष्ट घडली होती. त्या शपथविधीनंतर अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे १५ आमदार नॉट रिचेबल असल्याची बातमी मागोमाग धडकली. त्यातच अजित पवार शरद पवारांच्या इशाऱ्यावर भाजपला पाठिंबा द्यायला गेले होते अशीही अफवा उठली होती. त्या दिवशी अनपेक्षित असं हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं होतं. एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते महाविकास आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असतानाच अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते.

शरद पवारांची एंट्री अन् साडेतीन दिवसात सरकार कोसळलं...

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांची या प्रकरणात एंट्री झाली. अजित पवारांनी जे केलं त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नाही, अजित पवारांना कोणताही राष्ट्रवादीचा आमदार पाठिंबा देणार नाही, असं पवारांनी जाहीर करुन टाकलं. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर हळुहळू राष्ट्रवादीचे नॉट रिचेबल आमदार एकामागोमाग एक परतू लागले. या ऐतिहासिक शपथविधीनंतर पुढच्या ४८ तासात राष्ट्रवादीचे सारे आमदार राष्ट्रवादीसोबत आले. तिसऱ्या दिवसापर्यंत अजित पवारांकडे एकाही आमदाराचा पाठिंबा नव्हता.

अजित पवारांविरोधात तीव्र संताप

शरद पवारांना अंधारात ठेवून केलेल्या या कृत्यामुळे अजित पवारांविरोधात राष्ट्रवादीमधूनच तीव्र संताप व्यक्त होत होता. यानंतर महाविकास आघाडीनं स्थापन झालेल्या सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे फडणवीस-अजितदादा बहुमत कसं सिद्ध करतात याकडे लक्ष लागलं होतं. अखेर चौथ्या दिवशी सकाळी अजितदादांनी माघार घेतली आणि उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीसांनाही माघार घ्यावी लागली आणि त्यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अखेर हे सरकार अवघ्या साडेतीन दिवसात कोसळलं आणि सर्वात कमी कालावधीचं सरकार म्हणून याची नोंद झाली.

अजितदादांचा असाही रेकॉर्ड...

पहिली टर्म पूर्ण करणारे मुख्यमंत्री फडणवीस सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले पण अवघ्या काही दिवसांसाठी. अजित पवार यांनी फडणवीसांसोबत शपथ घेतली तीही उपमुख्यमंत्री म्हणूनच. अजितदादांनी याआधीही उपमुख्यमंत्री पदावर काम केलं होतं आणि आताही ते उपमुख्यमंत्रिपदावरच आहेत. कारण अजितदादा राष्ट्रवादीच्या गोटात परतले पण उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच कायम राहिलं. या ऐतिहासिक शपथविधीनंतर कुठलाही दगाफटका होऊ शकतो याचा धसका सगळ्याच राजकीय पक्षांनी घेतला. असं काही परत होऊ नये यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसनं मग वेळ घालवला नाही. तिन्ही पक्ष युद्धपातळीवर एकत्र आले आणि अवघ्या आठवड्याभरात म्हणजे २८ नोव्हेंबरला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.

 

Web Title: On this day in 2019 Devendra Fadnavis and Ajit Pawar took Oath and formed government, What exactly happened on that day ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.