शीतल पाटील --सांगली --सध्या बांधकाम साहित्याचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांसाठी घराचे स्वप्न दिवास्वप्न ठरू लागले आहे. घर बांधकामासाठी आवश्यक असणारे सिमेंट, वाळू, क्रश यांसह बांधकाम मजुरीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचवेळी वीट व सळईच्या दरात मात्र घट झाली आहे. तथापि बांधकामाचे ‘बजेट’ वाढल्याने घरबांधणी पूर्वीइतकी सोपी राहिलेली नाही. सिमेंट, वाळू, विटा, सळई व मजुरीच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे घराचे बांधकाम करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. बांधकाम साहित्य दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सिमेंट व वाळूची दरवाढ झाल्याचा परिणाम इतर काही साहित्यावर झाला आहे. मात्र सळई, वीट व बांधकाम दरात घट झाल्याचे सांगण्यात येते. पूर्वी बांधकामाचा दर प्रति चौरस फुटाला १२० ते १३० रुपये इतका होता, पण वाळू बंद झाल्याने अनेकांनी घराचे बांधकाम थांबविले, तर काहींनी आणखी वाट पाहण्याचा निर्णय घेतल्याने बांधकामाचा दर ९० ते ९५ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बांधकामाचा दर कमी झाला असला तरी, मजुरीचा दर मात्र त्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बांधकामावरील गवंड्याला पूर्वी ५०० रुपये मजुरी मिळत होती. आता ती ६०० ते ७०० रुपयांपर्यंत गेली आहे. अकुशल कामगारांना ३५०-४०० रुपये दिले जात होते, आता हा कामगार ५०० रुपये घेतल्याशिवाय कामावरच येत नाही. त्यामुळे मजूर पुरवठादारांची कोंडी झाली आहे. त्यामुळे घरबांधणी आता आणखीनच अवघड बनल्याचे चित्र आहे. वाळू आठ ते दहा हजार रुपये ब्रासवाळू उपसा बंद झाल्याने गेल्या आठ ते दहा दिवसात वाळूच्या किमतीत दीडपटीने वाढ झाली आहे. वाळूच्या एका ब्रासचा दर आठ ते दहा हजारांच्या घरात गेल्याने सर्वसामान्यासोबतच बांधकाम व्यावसायिकांनादेखील जबर फटका बसला आहे. वाळू बंद होण्यापूर्वी एका ब्रासचा दर चार हजार रुपयांच्या घरात होता. मात्र आठवड्यात हा दर दीडपटीने वाढल्याने वाळूला सोन्याची किंमत आली आहे.क्रशला मागणी वाढलीवाळू बंद झाल्यानंतर बांधकाम करणाऱ्यांनी दगडी क्रशचा वापर सुरू केला. पण क्रशचालकांनी त्याच्याही दरात दुपटीने वाढ केली. पूर्वी क्रशचा एका ब्रासचा दर १५०० ते २००० रुपये होता. आता तो ३५०० रुपयांवर गेला आहे. मागणीअभावी विटांचे दर घसरलेसध्या विटांचे दरही घसरले आहेत. गत वर्षाच्या तुलनेत मागणीमध्येच २० टक्के घट झाली आहे. सध्या १००० विटांसाठी ३४०० ते ३५०० रुपये दर आहे, तर विटांच्या उत्पादनाचा खर्च मात्र ३८०० रुपये आहे. बगॅस, माती, मजुरीचे दर वाढले, पण मागणी घटल्याने विक्रीच्या दरात मात्र घट झाली आहे. सळईच्या दरात घटसळईच्या दराची स्थिती मात्र नेमकी उलटी आहे. वाळूबंदीनंतर बऱ्यापैकी बांधकामे थांबली. त्यामुळे बाजारपेठेतील सळईला मागणी घटल्याने दरातही सहा हजाराची घट झाली आहे. पंधरवड्यापूर्वी ४४ हजार रुपये टन असलेला सळईचा दर आता ३८००० रुपयांपर्यंत आला आहे. त्यात आणखी एक हजाराची घट होऊ शकते, असे विक्रेत्यांनी सांगितले.
सामान्यांसाठी घराचे स्वप्न ठरतेय दिवास्वप्न
By admin | Published: May 04, 2017 11:52 PM