बारामती : चंद्रकांत पाटील ही फार मोठी व्यक्ती आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने बोलणे योग्य होणार नाही, अशा उपहासात्मक शैलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना रविवारी टोला हाणला.
बारामती येथे पंचायत समितीच्या नवीन इमारतीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. १० मार्च रोजी देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १० मार्चनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाणार असल्याचे विधान केले होते. या मुद्द्यावर माध्यमांनी उपमुख्यमंत्री पवार यांनी छेडले असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.
‘शिवसेना आमदारांच्या तक्रारींची दखल घेऊ’राज्यातील शिवसेनेचे आमदार सातत्याने आपल्याला निधी कमी दिला जातो, अशी तक्रार करतात, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, प्रत्येक पक्षाच्या आमदाराला आपल्याला निधी मिळाला पाहिजे असे वाटत असते. यामध्ये कोणाचेच समाधान होत नाही. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मिळणाऱ्या उत्पन्नावर हा रथ चालवावा लागतो. त्यामध्ये विकासकामांमध्ये कोणताही खंड पडता कामा नये, असा आमचा प्रयत्न आहे. शिवसेना आमदारांच्या अडचणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून सोडवण्यात येतील, असे पवार म्हणाले.