"अर्थसंकल्पाची गुप्तता पाळली नाही"; विरोधकांच्या टीकेवर अजित पवार म्हणाले, "काही बातम्या या..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 02:08 PM2024-07-05T14:08:12+5:302024-07-05T14:24:44+5:30

Maharashtra Budget : अर्थसंकल्पावरील भाषणादरम्यान अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

DCM Ajit Pawar reply to Sharad Pawar who said the budget was split | "अर्थसंकल्पाची गुप्तता पाळली नाही"; विरोधकांच्या टीकेवर अजित पवार म्हणाले, "काही बातम्या या..."

"अर्थसंकल्पाची गुप्तता पाळली नाही"; विरोधकांच्या टीकेवर अजित पवार म्हणाले, "काही बातम्या या..."

Ajit Pawar on Maharashtra Budget : आठवड्याभरापूर्वी महाराष्ट्र सरकारने आपला अर्थसंकल्प जाहीर केला. त्यानंतर सरकारच्या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी टीका केली होती. या अर्थसंकल्पाची गुप्तता पाळली गेली नाही आणि तो फुटला असा दावा शरद पवार यांनी केला होता. अधिवेशनातही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांनीही अशाच प्रकारे टीका केली होती. मात्र आता विधानसभेत अजित पवारांनी अर्थसंकल्प फुटल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पावर भाषण केले. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधताना शेरोशायरीचा वापर केला. त्याआधीच भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी विरोधकांनी केलेल्या अर्थसंकल्प फुटीच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मी स्पष्टपणे सांगतो, की अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही, असे अजित पवार यांनी ठामपणे सांगितले.

"भाषणाच्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट स्पष्ट करतो की, अर्थसंकल्प फुटल्यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील यांनी विधान केलं होतं. अर्थसंकल्पापूर्वी वर्तमानपत्रात नेहमीच अर्थसंकल्पातील तरतुदी छापून आल्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला. जयंत पाटील यांनी तर ९ वेळा अर्थमंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे. अर्थसंकल्पाकडून नागरिकांच्या काही अपेक्षा असतात. या अपेक्षांचा कानोसा घेऊन माध्यमांमध्ये त्यावर चर्चा होत असते. त्यासंदर्भातल्या बातम्या छापल्या जात असतात,” असं अजित पवार म्हणाले.

"अर्थसंकल्पापूर्वी काही बातम्या वर्तमानपत्रांत, माध्यमांमध्ये आल्या म्हणजे अर्थसंकल्प फुटला असं म्हणता येणार नाही. हे सदस्य तसं म्हणत असतील तर ते माध्यमांवर अन्याय करणारं आहे. मी स्पष्टपणे सांगतो, की अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही. त्याची गोपनीयता पूर्णपणे राखली गेली आहे," असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

काय म्हणाले होते शरद पवार?

"अर्थसंकल्पसंदर्भातील माहिती आधी बाहेर येता कामा नये. कारण त्याला अर्थसंकल्प फुटला असं म्हणतात. काल अर्थसंकल्प मांडण्यात आला. पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत अर्थसंकल्पात काय काय येणार आहे, ते छापून आलं होतं. अनेक गोष्टी विधानभवनात मांडण्यापूर्वीच बाहेर आल्या होत्या. याचा अर्थ स्पष्ट आहे की अर्थसंकल्पाची गुप्तता पाळली गेली नाही," असं शरद पवार म्हणाले होते.

Web Title: DCM Ajit Pawar reply to Sharad Pawar who said the budget was split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.