देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ शब्दावर अजित पवारांनी घेतली फिरकी; “मी इतकी वर्ष काम केले, पण...”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 04:32 PM2021-11-13T16:32:08+5:302021-11-13T16:32:37+5:30
काहीतरी सांगून लोकांची दिशाभूल करायची आणि वेळ मारुन न्यायची यातला हा प्रकार आहे असा टोला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या निधीतून सुरु असलेल्या कामांचं भूमिपूजन आणि उद्धाटन समारंभ आज पार पडला. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांना मिळून तब्बल २३० कोटी रुपयांचा निधी विकासकामांना मिळाला असून त्यातून ही कामे होणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) निशाणा साधला.
अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की, अनेकजण निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काहीतरी थातुरमातुर सांगून लोकांची दिशाभूल करतात. पिण्याच्या पाण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून जामखेडकर संघर्ष करत आहेत. पिण्याचे पाणी जास्त दाबाने यावं यासाठी मी स्वत: आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी प्रयत्न केले. या मतदारसंघाचे स्थानिक आमदार रोहित पवार यांनी सातत्याने या गोष्टींसाठी पाठपुरावा करत ही योजना मार्गी लावण्याचं काम केले असं त्यांनी सांगितले.
तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री इथं आले त्यांनी खिशातून एक कागद दाखवला आणि सांगितले मी तुमची योजना तत्वत: मंजूर करतो. तत्वत: म्हणजे काय? एकतर योजना मंजूर तरी करायला हवी किंवा मंजूर करणार आहोत असं सांगायला हवं. मागील अनेक वर्ष मी राजकारणात आहे. पण तत्वत: म्हणजे काय? काहीतरी सांगून लोकांची दिशाभूल करायची आणि वेळ मारुन न्यायची यातला हा प्रकार आहे असा टोला अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
आता जरा गपगुमान बसा...
ज्यांनी जे काही काम केले त्याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे. कोरोना काळानंतर आम्ही आमदारांचा निधी ४ कोटी केला तर केंद्रानं खासदार निधी बंद केला. आधीच्या आमदारांनी व्यवस्थित काम न केल्यानं ते काम अडचणीत येत होते. आता रोहित पवार प्रयत्न करत आहेत. या कामांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी मिळत आहे. त्यामुळे अमुक एखादं काम माझ्या काळात मंजूर झालं तर त्यात काही तथ्य नाही. कामं वेळेत पूर्ण करावी लागतात. १० वर्ष आमदार असताना तुम्ही जे केले ते दिसते. परंतु आता रोहित पवार कामं करतायेत. त्यामुळे त्यांच्या कामाचं श्रेय लाटण्याचं प्रयत्न करू नका. आता जरा गपगुमान बसा, आपलं कुठं चुकलं त्याचं आत्मपरिक्षण करा असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार राम शिंदे यांना लगावला आहे.