…अन् अजित पवारांनी पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचा हट्ट; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 04:50 PM2022-02-03T16:50:27+5:302022-02-03T16:50:57+5:30

उपमुख्यमंत्री कार्यालयात विलास मोरे हे चोपदार पदावर कार्यरत आहेत. येत्या काही दिवसात ते सेवानिवृत्त होत आहेत

DCM Ajit Pawar's affectionate nature was seen in the Mantralay | …अन् अजित पवारांनी पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचा हट्ट; नेमकं काय घडलं?

…अन् अजित पवारांनी पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचा हट्ट; नेमकं काय घडलं?

googlenewsNext

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी, करड्या शिस्तीसाठी,  वेळेच्या काटेकोर नियोजनासाठी प्रसिध्द आहेत. अजितदादांकडे सध्या अर्थसंकल्प तयारीच्या बैठका सुरू आहेत. सकाळी आठ वाजताच अजितदादा मंत्रालयात येतात आणि बैठकांमध्ये व्यस्त असतात. करड्या शिस्तीच्या,  कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेल्या अजितदादांचं अनोखं रुप मंत्रालयातील उपस्थितांनी बुधवारी अनुभवलं.

आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अजितदादांनी त्यांच्या कार्यालयातील चोपदारांच्या मुलगी आणि जावयाची  उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा पूर्ण केली. चोपदार विलास मोरे यांची मुलगी आणि जावयाला फक्त भेट दिली नाही, तर दिलखुलास संवाद साधला. संवाद साधताना अजितदादांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. मुंबईत कुठे राहता. कुठल्या शाळेत शिकलात. अमेरिकेत कधी गेलात. अमेरिकेत कुठे राहत होता. तिथं कामाची वेळ, स्वरूप कसं असतं. तिथं छोट्या बाळाला कोण सांभाळतं, असे प्रश्न विचारले. लग्न कसं जमलं, लव्ह की अरेंज मॅरेज ? हा प्रश्नही दादांनी विचारला. दोघांच्या घरच्यांचीही दादांनी आपुलकीनं  चौकशी केली. अजितदादांच्या जिव्हाळ्याच्या वागण्यानं निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चोपदार विलास मोरे कृतार्थ झाले, तर त्यांची लेक आणि जावई अक्षरश: भारावून गेले होते.  

नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री कार्यालयात विलास मोरे हे चोपदार पदावर कार्यरत आहेत. त्यांनी सेवाकाळात सचोटीनं सेवा केली. येत्या काही दिवसात ते सेवानिवृत्त होत आहेत. चोपदार विलास मोरे यांची मुलगी स्नेहा हिचं चार वर्षापूर्वी गणेश साळुंखे यांच्याशी लग्न झालं. त्यांचे जावई आयटी कंपनीत अमेरिकेत नोकरीला होते. हे दाम्पत्य अमेरिकेत स्थायिक होतं, मात्र कोरोनामुळं ते पुन्हा भारतात परत आले आहेत, आणि इथूनंच काम करत आहेत. विलास मोरे यांच्या मुलीची आणि जावयाची, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याची अनेक दिवसांपासून इच्छा होती. ही इच्छा ते वारंवार मोरे यांच्याकडं व्यक्त करत होते.  

लेकीचा आणि जावयाची इच्छा अजितदादांना सांगण्याची चोपदार विलास मोरे यांची हिंमत होत नव्हती. चोपदारांनी परवा हिंमत करुन त्यांच्या मुलीला आणि जावयाला आपल्याला भेटायचं आहे, असं अजितदादांना सांगितलं. त्यावर अजितदादांनी तात्काळ होकार दिला. वेळापत्रक व्यस्त असूनही  दुसऱ्या दिवशीच भेटायला बोलवलं. दादांची परवानगी आणि वेळ मिळाल्यानंतर चोपदारांची मुलगी स्नेहा आणि जावई गणेश यांनी बुधवारी अजितदादांची भेट घेतली. अजितदादांनी सुध्दा आपुलकी, जिव्हाळ्यानं त्यांच्याशी संवाद साधला. वैयक्तिक, कौटुंबिक चौकशी केली. मुलगी व जावयाच्या कर्तबगारीबद्दल अजित पवारांनी चोपदार विलास मोरे यांचंही कौतुक केलं. अजित पवारांनी केलेलं कौतुक तसंच लेकीचा, जावयाचा हट्ट अजितदादांनी पुरवल्यामुळं सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चोपदार विलास मोरे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते

Web Title: DCM Ajit Pawar's affectionate nature was seen in the Mantralay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.