राजकारणातील ‘चाणक्य’ अन् ‘दादा’ यांची ही दोस्ती तुटायची नाय...; बॅनर झळकले, चर्चांना उधाण!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 04:54 PM2023-07-22T16:54:01+5:302023-07-22T16:57:41+5:30
Devendra Fadnavis And Ajit Pawar Birthday: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा आहे.
Devendra Fadnavis And Ajit Pawar Birthday: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. काहीच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत सत्तेत सामील झाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा पदभार देण्यात आला. यातच फडणवीस आणि पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजकारणातील चाणक्य आणि दादा यांची ही दोस्ती तुटायची नाय, असा बॅनर झळकल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना ही दोस्ती तुटायची नाय असे बॅनर लावत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून नागपूरात हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर "ही दोस्ती तुटायची नाय" असे लिहून त्याखाली "राजकारणातील ‘दादा’ अजित दादा, राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा" असा संदेश देण्यात आला आहे.
'चाणक्य' अन् दादांची दोस्ती तुटायची नाय?
शिंदे-फडणवीस सकारमध्ये सामिल झालेले अजित पवार दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका ते पीएम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढणार आहेत. तसेच यापूर्वी अजित पवार यांनी फडणीसांना साथ देत पहाटे उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतली होती, मात्र थोड्याच वेळात त्यांनी माघार घेतली.
दरम्यान, त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार बंड करत त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे खरंच यापुढे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची दोस्ती तुटणार नाही का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.