Devendra Fadnavis News: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीला बळ मिळाल्याची चर्चा सुरू आहे. अनेकविध मुद्द्यांमध्ये आता स्वातंत्र्यवीर सावकर यांचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे, वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला वीर सावरकरांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. देवेंद्र फडणवीसांनी १३ मार्च रोजी यासंदर्भात पत्र लिहिले होते. या पत्रात कोस्टल रोड, वांद्रे वर्सोवा सिलिंक आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला नवीन नावे देण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यापैकी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला वीर सावरकरांचे नाव देण्यात यावे
मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल)ला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे)ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अन्य दोन मागण्या पूर्ण होणार का, यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राज्यात अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांची कामे होत आहेत आणि त्याला तितक्याच आदर्श व्यक्तिमत्त्वांची, महापुरुषांची नावे देणे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. ही विकास कामे जशी जनसुविधा म्हणून सातत्याने ओळखली जातील, तशीच त्या प्रत्येक कामाच्या निमित्ताने आपल्या महापुरुषांच्या आणि महनीयांच्या आदर्शाचे सुद्धा स्मरण येणाऱ्या पिढ्यांना झाले पाहिजे, ही बाब सुद्धा तितकीच आवश्यक आहे आणि तीच या मागण्यांमागची भूमिका आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.