लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देवेंद्र फडणवीस स्पायडरमॅन आहेत का? सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद ते कसे सांभाळणार, या जिल्ह्यांमध्ये जाणार कसे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्याला फडणवीस यांनी चार दिवसांत सहा जिल्ह्यांमध्ये जात आणि जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सहा बैठका घेत उत्तर दिले आहे.
२८ सप्टेंबरला पटोलेंनी टीका केली. फडणवीसांनी १ ऑक्टोबरला गडचिरोलीत डीपीसी घेतली. या जिल्ह्यातील पोलिसांचे वेतन दीडपट करण्याचे आश्वासन दिले अन् तीन दिवसांत जीआर काढला. त्याच दिवशी त्यांनी वर्धेला डीपीसी बैठक घेतली. नागपूरला परतले, २ ऑक्टोबरला वर्धेत गांधी जयंतीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. ३ ऑक्टोबरला त्यांनी भंडारा जिल्ह्याची डीपीडीसी बैठक घेतली. म्हणजेच दोन दिवसांत ३ जिल्ह्यांचा प्रवास त्यांनी केला.
नंतरच्या काळात मुंबईत मंत्रिमंडळ बैठका आणि नवरात्री भेटींचा त्यांचा सिलसिला सुरू राहिला. ५ ऑक्टोबरला पुन्हा नागपूरला जात रा. स्व. संघाचा विजयादशमी उत्सव आणि सायंकाळी दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. ६ ऑक्टोबरला त्यांनी नागपूर जिल्ह्याची डीपीडीसी बैठक घेतली. ७ ऑक्टोबरला अमरावती आणि अकोला जिल्ह्यांच्या डीपीडीसी बैठका घेतल्या. अमरावती येथे बैठक घेताना वाढीव प्रॉपर्टी टॅक्सला स्थगिती देऊन त्यांनी नागरिकांना मोठा दिलासा दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"