Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसपूस समोर येताना दिसत आहे. सुरुवातीला जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकताना दिसत आहेत. आधी जयंत पाटील, मग अजित पवार आणि आता सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणून पक्ष कार्यालयाबाहेर झळकले. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावला.
राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांचे फोटो लावलेले पोस्टर मुंबईत काही ठिकाणी लावण्यात आले होते. त्यावर सुळे यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री होणार असल्याचा उल्लेख केला आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या पोस्टरवरून जोरदार राजकीय चर्चाही सुरू झाल्या आहेत. या पोस्टरवर सुप्रिया सुळे यांनी नाराजी दर्शवली आहे. मात्र, या प्रकारावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी खोचक लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अशी पद्धत आहे की...
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अशी पद्धत आहे की, भावी म्हणून सांगत असतात. भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशा अनेक गोष्टी सांगत असतात. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे. कधीही काहीही होऊ शकते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील असे कधी कुणाला वाटले होते का? ते बनले त्यामुळे ज्याला-ज्याला भावी वाटतोय त्याला-त्याला शुभेच्छा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत असताना भावी पंतप्रधान म्हणून शरद पवार यांना नाव न घेता डिवचले. तर उद्धव ठाकरे यांनाही यावेळी नाव घेऊन टोला लगावला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेले भाष्य चर्चेचा विषय ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे पोस्टर कोणी लावले, याचा पुरावा असला पाहिजे. या देशात कोणालाही कोणाचेही पोस्टर लावता येणार नाही. हे पोस्टर अथवा त्याचा फोटो मी पाहिलेला नाही. माझा फोटो विनापरवानगी वापरण्याचा कोणालाही अधिकार नाही. उद्या तुमच्या कुटुंबातील पत्नी, मुलीचा असा फोटो लागला तर तुम्हाला चालेल का? पोस्टरबाबत पत्रकारांकडूनच यासंबंधी मला माहिती मिळाली. ते पोस्टर कोणत्या पक्षाने, व्यक्तिने लावले आहे का याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळवावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"