Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर अद्यापही यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला या प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अधिक भाष्य केले नव्हते. मात्र, आता यासंदर्भात शरद पवारांनी एक विधान केले आहे. यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यातच सध्या तुम्हाला अर्धेच समजले आहे. हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणार असल्याचे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
प्रसारमध्यामांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हळूहळू सगळे गौप्यस्फोट होत आहेत. मी जे बोललो तेच कसे खरे होते, हे तुम्हाला हळूहळू समजत आहे. मात्र सध्या तुम्हाला अर्धेच समजलेले आहे. अर्धे समजायला अद्याप वेळ आहे. मी काहीही बोललो की समोरून आणखी दुसरी गोष्ट बोलली जाते. त्यामुळे मी हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणार आहे. काळजी करू नका. तुम्हाल सगळे समजेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रपती राजवट लावण्यामागे नेमकी कारण काय?
तत्पूर्वी, राष्ट्रपती राजवट लावण्यामागे नेमकी कारण काय? हे शरद पवारांनी सांगावे. राष्ट्रपती राजवट का लागली? राष्ट्रपती राजवट कुणाच्या सांगण्यावरुन लागली? त्याच्या पाठीमागे काय होते? याचा खुलासा शरद पवार यांनी करावा, त्यानंतर सर्व कड्या जुळतील अन् तुमच्यासमोर उत्तरे येतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
दरम्यान, सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली. ती उठल्यानंतर काय घडले ते तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. राज्यात तेव्हा तसे काही घडले नसते तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का? असे शरद पवार पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"