Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप वाढताना दिसत आहेत. प्रचारसभा, बैठका यांचा वेगही वाढला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला काही तास राहिले असून, सर्व पक्ष आता तिसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेसाठी सज्ज होताना दिसत आहेत. शरद पवार भाजपासोबत यायला तयार होते, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यानंतर आता यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सूचक शब्दांत भाष्य केले आहे.
भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच पुणेकरांचे भाजपा आणि महायुतीवर प्रचंड प्रेम आहे. जनता आमच्या पाठिशी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनेक बदल झाले. पुण्यात मेट्रो, बस सुविधा यांपासून चांगले बदल झालेले आहेत. पुणे कसे बदलत आहे, हे लोक पाहत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शरद पवार-सुप्रिया सुळे यांच्यासाठी भाजपाची दारे खुली असतील का?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन पक्ष तयार झाले. काही दिवसांपूर्वी अजित पवार पुन्हा परत आल्यास तुम्ही सोबत घ्याल का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर भाजपा नको, बाकी कुणीही चालतील, असे उत्तर शरद पवारांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपासोबत आले तर दारे खुली असतील का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
त्या त्या परिस्थितीनुसार निर्णय होत असतात
राजकारणात जर-तरला काहीही अर्थ नसतो. त्या त्या परिस्थितीनुसार निर्णय होत असतात. त्यामुळे, जर-तरच्या प्रश्नावर मी उत्तर देत नसतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपासोबत जाऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात असून, आगामी विधानसभा निवडणुकीत काय काय राजकीय घडामोडी घडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.