Devendra Fadnavis News: आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात सामील करावे, या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीविरोधात राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शड्डू ठोकत आक्रमक भूमिका घेतली. ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यातच आता छगन भुजबळ भाजपा प्रवेश करणार असल्याचा मोठा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. यावरून आता प्रतिक्रिया येत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, भुजबळ भाजपाच्या वाटेवर? एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठे करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप, अशा शब्दांत दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. यावर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
अंजली दमानिया या सुप्रिया सुळे यांच्या अधिक संपर्कात असतात
मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत. अलीकडील काळात अंजली दमानिया या सुप्रिया सुळे यांच्या अधिक संपर्कात असतात. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे ट्विट केले असेल. पण छगन भुजबळ त्यांच्या पक्षात आहे, आम्ही आमच्या पक्षात आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, खुद्द छगन भुजबळ यांनीही अंजली दमानिया यांच्या दाव्यावर भाष्य केले. अंजली दमानिया यांना ती माहिती कुठून मिळाली हे माहिती नाही. मात्र भाजपा प्रवेशाचा माझ्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही. मी राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थ असण्याचे कोणतेही कारण नाही. मी घेतलेल्या भूमिकेवर पक्षातील कोणीही टीका केली नाही. स्वत: अजित पवार यांनीही सांगितले की, भुजबळ त्यांच्या समाजाच्या वतीने भूमिका मांडत आहेत. त्यामुळे मी राष्ट्रवादीत का अस्वस्थ असेल? असा प्रतिप्रश्न भुजबळ यांनी विचारला.