Devendra Fadnavis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते. सहकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’ च्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची भेट घेतल्याचे वृत्त आले होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे. लवकरच जयंत पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या दौऱ्यात अमित शाहांसोबत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना जयंत पाटील यांच्या भेटीबाबत विचारणा करण्यात आली.
अमित शाह-जयंत पाटील यांची नक्की भेट झाली का?
मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना अमित शाह आणि जयंत पाटील यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर, काही लोकांना अफवा उठवायला खूप आवडते. किमान माध्यमांनी खात्री करुन बातम्या दिल्या पाहिजेत. जयंत पाटील यांची कुठलीही भेट अमित शाह यांच्याशी झालेली नाही. जे पतंगबाजी करत आहेत, त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी स्तर ठेवावा. तसेच कन्फर्मेशन करुनच अशा बातम्या द्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबतचे वृत्त फेटाळले. या चर्चांवर स्पष्टीकरण देणार नाही. दररोज नव्या बातम्या समोर येत आहेत. गैरसमज पसरवले जात आहेत. अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल भुसारा आम्ही रात्री दीड वाजेपर्यंत एकत्र होतो. सकाळी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी पक्षवाढीवर चर्चा केली. राजकीय वर्तुळातील कोणताही गट अशा बातम्या पेरतो असे म्हणणार नाही. माझ्यबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. अशा बातम्यांमुळे माझे मनोरंजन होत आहे. कुठे जाणार की नाही, याबाबत काहीच सांगितलेले नाही. माझ्याबद्दल काही अफवा पसरवल्या जात आहेत. पक्षाशी एकनिष्ठ आहे. शरद पवार यांच्यासाोबतच आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांना भेटल्याच्या चर्चाही निराधार आहे. कुठेही गेलो तरी तुम्हाला सांगून जाईन, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.