Maharashtra Politics: “अजित पवारांकडे खूप वेळ, टीकेला उत्तर द्यायला मला अजिबात वेळ नाही”; देवेंद्र फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 06:44 PM2022-09-17T18:44:19+5:302022-09-17T18:49:09+5:30
Maharashtra News: सरकारमधील मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही. जग कुठे चाललेय, अशी टीका अजित पवारांनी केली होती.
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवीन सरकार स्थापन झाल्याला आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेते सातत्याने अनेकविध मुद्द्यांवरून नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना, अजित पवार यांना खूप वेळ आहे. पण मला नाही, असा टोला लगावला आहे.
राज्य सरकारमधील अर्ध्याहून अधिक मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने अद्याप मंत्रालयातील दालनात कार्यभार स्वीकारलेला नाही, असे कळते. परंतु जग कुठे चालले आहे आणि यांचा पितृपक्षामुळे कारभार अडला आहे, असे सांगत अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारवर सडकून टीका केली होती. अजित पवार यांनी केलेल्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर, अजित पवारांना खूप वेळ आहे, ते असे सगळे आरोप करत राहतील. त्याची उत्तर द्यायला मला थोडीच वेळ आहे, मला खूप कामे आहेत, असा टोला लगावत अजित पवारांनी केलेल्या टीकेवर अधिक भाष्य केले नाही.
विरोधकांच्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही
शिंदे -फडणवीस अस्तित्वात आल्यापासून प्रस्ताव स्थगिती सुरू आहेत. १३८ उद्योग एमआयडीसी मध्येच अडकले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर बोलताना, विरोधकांना कुठलीही माहिती नाही. कुठलीही माहिती न घेता ते बोलतात त्यामुळे ज्यांना माहिती नाही , अशा विरोधकांच्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भय आणि भ्रष्टाचाराच्या जोरावर भाजपा लोकशाही विकत घेत आहे आणि विकण्याची प्रक्रिया राबवत आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली होती. यासंदर्भातही देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, नाना पटोलेंना असे झटके येत असतात. त्यामुळे ते असे काही काही बोलत असतात, अशा शब्दांत पलटवार केला.