Devendra Fadnavis News: राम मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला आता काही दिवस राहिले आहेत. अयोध्येत कामांना आणखी वेग आला आहे. देशभरात हा सोहळा साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राम मंदिरावरून आरोप-प्रत्यारोपांची धारही वाढताना दिसत आहे. कारसेवकांनी कलंकित ढाचा पाडला तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. तिन्ही वेळा कारसेवेत गेलो होतो, याचा अभिमान आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
श्रीराम मंदिर प्रतिकृती रथाचा मुंबई येथे शुभारंभ झाला. यावेळी दिग्दर्शक रोहित शेट्टी, मंत्री गिरीश महाजन, श्वेता शालिनी व अन्य मान्यवर उपस्थित होते. यानंतर मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राम मंदिर देशात तयार होत आहे. हे पर्व सगळ्या देशाचे आहे. प्रत्येक हिंदू माणसाचे आहे. देशात भारतीय संस्कृती मानणाऱ्या प्रत्येकाचे मंदिर आहे. ज्याला वाटते आहे मी हिंदू आहे, ज्याला वाटते मी भारतीय आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हे पर्व आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
बाकीचे तेव्हा कुठे लपले होते त्यांच्यावर कशाला बोलायचे?
कारसेवकांनी बाबरीचा कलंकित ढाचा पाडला तेव्हा तिथे उपस्थित होतो. या गोष्टीचा अभिमान आहे की, तिन्ही वेळा कारसेवेत गेलो होतो. बाकीचे तेव्हा कुठे लपले होते त्यांच्यावर कशाला बोलायचे? मी काही लोकांची पर्वाच करत नाही. जेव्हा कारसेवा करायची होती तेव्हा हे लोक लपून बसले होते. हे कुणीही कारसेवेसाठी गेले नाहीत. आम्ही कारसेवक आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. तिन्ही कारसेवांमध्ये मी गेलो होतो. बदायूच्या तुरुंगात गेलो आहे. आता काही लोक जळतात कारण ते घाबरुन घरी बसले होते. त्यांच्याविषयी कशाला बोलायचे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
दरम्यान, देशात ५०० वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर तयार होत आहे. आपल्यावर जो कलंक बाबरने लावला होता तो हटवण्याचे काम आम्ही करत आहोत. या देशाची आस्था असलेल्या रामाची मूर्ती मंदिरात असणार आहे. अशावेळी राजकारण करणे हे अत्यंत हीन दर्जाचे आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा सगळे मतभेद विसरुन रामापुढे हात जोडले पाहिजेत आणि संपूर्ण देश राममय कसा होईल ते पाहिले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.