Maharashtra Politics: विधिमंडळात लावण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राची निमंत्रण पत्रिका छापण्यात आली असून २३ जानेवारी रोजी म्हणजेच बाळासाहेबांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम होत आहे. या तैलचित्र अनावरण सोहळ्याची कार्यक्रमपत्रिका छापण्यात आली आहे. मात्र, या कार्यक्रम पत्रिकेत ठाकरे कुटुंबातील एकाही सदस्याचे नाव नाही किंवा स्व. बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांचेही नाव नाही. त्यामुळे तैलचित्रावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रम पत्रिकेत ठाकरेंच्या कुटुंबातील कोणाचेही नाव नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या तैलचित्राचे अनावरण होत आहे. तर, प्रमुख उपस्थिती म्हणून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असणार आहे. मात्र, यामध्ये उद्धव ठाकरेंचे नाव नसल्यावर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचे नाव नाही?
यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याबाबत मला कल्पना नाही. हा कार्यक्रम सरकार ठरवत नाही, त्यामुळे मला याबाबत माहिती नाही, असे सांगत या विषयावर अधिक बोलणे टाळल्याचे सांगितले जात आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली. ज्यांचे संपूर्ण आयुष्य घोटाळे करण्यात गेले, त्यांना सीमेंटचे रस्ते होत असल्याचे दुःख आहे. कारण सीमेंट कॉंक्रीटचे रस्ते झाले, तर पुढची ४० वर्ष नवीन रस्ते करण्याचे काम पडणार नाही. दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि त्यातून भ्रष्टाचार करायचा एवढेच आतापर्यंत सुरू होते. २०१८ साली जेव्हा चौकशी झाली, तेव्हा मुंबईतील २०० रस्त्यांमध्ये खालची पातळीच नव्हती. अशा प्रकारची कामे त्यांनी २५ वर्ष केली. आता त्यांच्या लक्षात येते आहे की, आपली दुकानदारी बंद करण्याचे काम हे काँक्रीट रस्ते करत आहेत, म्हणून त्यांची ओरड सुरू आहे, त्यांना आता मुंबईतील जनताच उत्तर देईल, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दरम्यान, मुंबई महापालिकेकडून ४०० किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होता. ४०० किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कोणी मांडला? आणि ६००० कोटी रुपयांचे काम प्रशासकाने मंजूर करणे कितपत योग्य आहे? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"