Maharashtra Politics: राज्यात अनेकविध राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकाबाजूला लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांनी जय्यत तयारीला सुरुवात केली असून, दुसरीकडे लोकसभेसोबत राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातच महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप तसेच शिवसेना शिंदे गट यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाने केलेल्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखात शिंदे गटाचा उल्लेख भाजपने खुराड्यात पाळलेल्या कोंबड्या आणि १३ तुर्रेबाज कोंबडे असा खासदारांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच मिंधे गटात २२ आमदार आणि ९ खासदार अस्वस्थ आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर देवेंद्र फडणवीस स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता
मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ आहे. तिकडे जेवढी अस्वस्थता आणि असंतुष्टता आहे, ती तीन-चार लोकांमुळे आहे. त्या संदर्भात मी बोलण्याऐवजी तुम्हाला भविष्यात कळेल, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. दुसरीकडे, शिवसेना किंवा एनसीपी असेल त्यांना माहिती आहे की पोपट मेला आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना निराश वाटू नये म्हणून अशा प्रकारची वक्तवे केली जात आहेत. पण अशा प्रकारच्या वक्तव्यांनी न्यायालयाचा कुठलाही निर्णय बदलत नसतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, ठाकरे गट वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं असेल. त्याबद्दल काय बोलणार, असे फडणवीस यांनी सांगितले.