Devendra Fadnavis: वृत्तपत्रातील जाहिरातीवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव असल्याचे दावे केले जात आहेत. यावरून शिंदे गट आणि भाजपमधील नेत्यांचे आरोप-प्रत्यारोपही झाले. मात्र, असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे बॉस आहेत. आमच्या नात्यात काहीच बदल झालेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.
राजकारणात अनैतिक गोष्टी कराव्या लागल्या, तरी काँग्रेस, एमआयएम, मुस्लिम लीग यांच्या विचारधारा वेगळ्या असल्याने त्यांच्याशी कधीही तडजोड करणार नाही. शिंदे यांना जनतेने स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. ते राज्यभरात फिरत आहेत. ‘शासन आपल्या दारी’सह वेगवेगळ्या योजना, उपक्रम आणि जनहिताचे निर्णय या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत. शिंदे यांनी जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आमच्यात योग्य समन्वय असून, वृत्तपत्रातील जाहिरातींवरून काही चर्चा झाल्या, तरी युतीला काहीच फरक पडलेला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
आमच्या नात्यात काहीच बदल झालेला नाही, सुदैवाने...
आमचे संबंध सुरुवातीपासून चांगले आहेत. आमच्यात योग्य समन्वय आहे. मी त्यांचा प्रोटोकॉल कधीच मोडू देत नाही. मी पाच वर्षे मुख्यमंत्री होतो. मी आता उपमुख्यमंत्री आहे. ते माझ्यासोबत मंत्री होते. त्यामुळे आमच्या नात्यात काहीच बदल झालेला नाही. आता, ते माझे बॉस आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते माझे नेते असून त्यांच्या हाताखाली मला काम करायचे आहे, हे माझ्या मनात पक्के बसले आहे. आणि सुदैवाने, मी बॉस किंवा नेता आहे, असे ते कधीच जाणवू देत नाहीत. मला वाटते की हे परस्पर आदराने चालले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान, २०२४ मध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे भाजपचे संसदीय मंडळ याबाबत निर्णय घेतील. राजकारणात मोठा त्याग करावाच लागतो आणि सहनशीलताही महत्त्वाची असते. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मी पदाधिकाऱ्यांना पक्षासाठी त्याग करण्याची आणि मंत्रिपदे, महामंडळांची मागणी न करण्याची सूचना केली, असे फडणवीस म्हणाले.