Maharashtra Politics: राज्यातील राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापल्याचे दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल, कसबा आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या दाव्यांमुळे आरोप-प्रत्यारोप तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा दावा योग्य असल्याचे सांगत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली.
मी पदावरून जाईपर्यंत त्या पत्रावर सही केली नाही. कारण त्यावेळी मुख्यमंत्री पदावर बसलेल्या उद्धव ठाकरेंनी मला पत्रातून धमकीच दिली होती. १२ आमदारांची नियुक्ती पंधरा दिवसांच्या आत किंवा त्याच्याही आधी करा, अशी धमकीच देण्यात आली होती. राज्यपाल हा काही राज्याचा रबरस्टँप नसतो. पाच ओळींचे पत्र लिहिले असते तरीही मी त्यांची मागणी मान्य केली असती. मला पत्रातून धमकी देण्यात आल्याने मी १२ आमदारांची नियुक्ती केली नाही, असा दावा भगतसिंह कोश्यारी यांनी केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.
भगतसिंह कोश्यारी यांनी जो दावा केलेला आहे, तो योग्य
राज्यपालांना अजित पवार यांनी पत्र लिहिले नव्हते. ते पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहिले होते. मी भगतसिंह कोश्यारी यांची मुलाखत पाहिलेली नाही. मात्र कोश्यारी यांनी जो दावा केलेला आहे, तो योग्य आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचा फॉरमॅट बदलला नव्हता. मला मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही पक्षाचे नेते राज्यापालांना भेटायला गेले होते. त्यानंतर अशा प्रकारे धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कारवाई करत नाहीत. योग्य फॉरमॅटमध्ये पत्र पाठवा, असे राज्यपालांनी तिन्ही पक्षाच्या नेत्यांना सांगितले होते. मात्र उद्धव ठाकरेंचा यामध्ये इगो होता. त्यामुळे त्यांनी पत्राचा फॉरमॅट बदलला नव्हता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे संत माणूस आहेत. ते कुठे राजकारणात आले? त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसताना त्यांना जबरदस्तीने तिकडे बसवण्यात आले. शरद पवारांसारखा मार्गदर्शकही उद्धव ठाकरेंना वाचवू शकला नाही. महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवले होते. आता नियतीने त्यांना खुर्चीवरून खाली उतरवले. मी त्यांना सत्तेतून खाली उतरवले नाही, अशी टीका भगतसिंह कोश्यारी यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"