Maharashtra Politics: “राहुल गांधींनी केलेल्या वीर सावरकरांच्या अपमानावर आता उद्धव ठाकरे गप्प का?”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 08:01 PM2023-02-26T20:01:01+5:302023-02-26T20:01:53+5:30
Maharashtra News: राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Politics: राज्यातील राजकारण विविध मुद्द्यांवरून तापलेले पाहायला मिळत आहे. यातच राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक महाविकास आघाडीचे नेते आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
बलवानांपुढे मान झुकवायची ही सावरकरांची विचारधारा आहे. म्हणजे कमकुवत असणाऱ्यांशीच तुम्ही लढणार का? याला भ्याडपणा म्हणतात. हाच का तुमचा राष्ट्रवाद. आम्हाला सत्याग्रही म्हणता, पण तुम्ही सत्ताग्राही आहात, असे राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या रायपूर अधिवेशनात बोलताना म्हटले आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
वीर सावरकरांच्या अपमानावर आता उद्धव ठाकरे गप्प का?
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला एक गोष्ट विचारायची आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. मागच्या काळात उद्धव ठाकरे यांची मजबुरी होती. त्यांना सरकार चालवायचे होते. त्यामुळे राहुल गांधी सावरकरांचा अपमान करायचे तरी उद्धव ठाकरे मूग गिळून बसायचे. मात्र आता तुमची काय मजबुरी आहे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दरम्यान, यावर्षीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक महिना चालणार आहे. या अधिवेशनात ८ मार्च रोजी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात येईल. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला जाईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच विरोधकांनी लोकायुक्तसारखा कायदा मंजूर करण्यासाठी मदत करावी. या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याचा आपण प्रयत्न करू, असेही फडणवीस म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"