पुणे : अस्वच्छतेतून होणाऱ्या आजारांना अटकाव घालण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये हँडवॉश स्टेशन उभारण्याचे आदेश राज्यशासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. आर्थिक वर्ष संपत आल्याने यासाठीचा निधी ३१ मार्चपर्यंत संपविण्यात यावा, असा आदेशच शिक्षण विभागाने २६ फेब्रुवारीला राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिला. मात्र, पुणे जिल्ह्याला असा कोणताही निधी मिळालेलाच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. निधीच मिळाला नाही, तर ही यंत्रणा ३१ मार्चपर्यंत सर्व शाळांमध्ये उभारणार कशी, असा प्रश्न पुणे जिल्हा परिषदेसमोर उभा राहिला आहे.स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ विद्यालयांतर्गत मुलांनी माध्यान्ह भोजनापूर्वी हात धुता यावे, यासाठी राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांनी हँडवॉश स्टेशन उभारण्याचे आदेश ७ नोव्हेंबर २०१५ ला शालेय शिक्षण विभागाने दिला होता. यासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशात, राज्यभरातील शाळांमध्ये सध्या स्वच्छ विद्यालय हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हँडवॉश स्टेशन उभारणीसाठी सर्व शिक्षा अभियानात प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांना ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रती शाळा १० ते १५ हजार रूपये खर्च होण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही महिने शिल्लक राहिल्याने ३१ मार्चपर्यंत हे स्टेशन उभारावेत आणि निधी खर्च करावा, असा नवा आदेश विभागाने काढला आहे. (प्रतिनिधी)> निधी पुरणार कसा?पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, खासगी अशा एकूण ७ हजार १६८ शाळा आहेत. मात्र, मंजूर निधी हा केवळ ५ लाखांचा आहे. प्रतिशाळा जर १० हजार खर्च गृहीत धरला, तरीही या निधी अंतर्गत केवळ ५० शाळांमध्येच हँडवॉश स्टेशन उभारले जाऊ शकते. त्यामुळे एवढासा निधी पुरणार कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आत्ताच उठाठेव का?सध्या शैक्षणिक वर्ष संपतच येत असल्याने आत्ताच हँडवॉश स्टेशन उभारण्याची उपयुक्तता काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हँडवॉश यंत्रणेसाठी ३१ मार्च डेडलाइन
By admin | Published: March 04, 2016 12:49 AM