पूजा दामले/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यपालांनी मुंबई विद्यापीठ निकाल प्रकरणात हस्तक्षेप करुन ३१ जुलैपर्यंतची डेडलाईन दिली आहे. त्यानंतर कुलगुरू आणि मुंबई विद्यापीठ सक्रिय झाले असले तरीही मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल जाहीर होण्यास १५ आॅगस्ट उजाडणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. रविवारी सायंकाळीही तब्बल ६ लाख ४६ हजार ६०४ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले नसल्याचे विशेष अधिकारी विनायक दळवी यांनी सांगितले. टीवायच्या परीक्षा एप्रिल महिन्यात सुरू होऊन १२ मे पर्यंत सर्व परीक्षा संपल्या होत्या. परीक्षा संपून आता ७० दिवस उलटूनही ४० ते ४५ टक्के उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झालेले नाही. या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाल्यावर मॉडरेशन करण्यात येणार आहे. यातील ३० ते ४० टक्के उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करायचे झाल्यास हा आकडा ८ लाखांवर जाऊ शकतो. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत छोटे निकाल जाहीर होऊ शकतात. पण, कला, विज्ञान, वाणिज्य आणि विधी अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्यास आॅगस्ट महिना उजाडणार आहे. याचाच अर्थ निकाल जाहीर व्हायला ८० ते ९० दिवसांचा कालावधी लागेल. निकाल लावण्याची विद्यापीठाने घाई केल्यास विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते अशी भीती विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या असून ३१ जुलैपर्यंत वाट पाहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुलगुरू संजय देशमुख यांनी घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कुलगुरूंनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहेराज्यपालांनी दिलेली ३१ जुलैची डेडलाइन आता पाळणे विद्यापीठाला शक्य नाही, असेच चित्र दिसते आहे. प्राध्यापक असूनही उत्तरपत्रिका तपासणी वेळेवर होत नाही. प्रत्येकवेळा कुलगुरू सर्वांना पाठिशी घालतात. कुलगुरूंचा कामकाजावर अंकुश राहिला नाही. त्यामुळे विद्यापीठात सर्वच गोष्टींमध्ये गोंधळ सुरू आहे. कुलगुरूंनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. - सचिन पवार, अध्यक्ष, स्टुण्डट लॉ काऊन्सिल मुंबई विद्यापीठाचे निकाल लांबणीवर पडल्याने आम्ही या आधीही आंदोलन केली आहेत. पण, आता ३१ जुलैच्या डेडलाइनची वाट पाहत आहोत. त्याआधी निकाल जाहीर होणे आता शक्य नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. याची जबाबदारी कुलगुरूंनी स्वीकारली पाहिजे. - सचिन बनसोड, अध्यक्ष, छात्रभारती आॅनलाइन तपासणीची पूर्व तयारी न करता कुलगुरूंनी ही प्रक्रिया राबवली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला फक्त कुलगुरूच जबाबदार आहेत. ३१ जुलैपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. त्यानंतर आमचे आंदोलन तीव्र केले जाणार आहे. राज्यपालांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देणार आहोत. - विजेता भोनकर, अध्यक्ष, छात्रभारती मुंबई विद्यापीठाचा निकाल अद्याप जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराला कुलगुरू जबाबदार आहेत. त्यामुळे सरकारने कुलगुरूंवर कारवाई केली पाहिजे. आता प्रत्येक महाविद्यालयात आंदोलन सुरू करणार आहोत. - रोहित चांदोडे, मुंबई अध्यक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अधिवेशनात गाजणार विद्यापीठाचा मुद्दामुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे शैक्षणिक आणि प्रशासकीय आघाडीवर सपशेल अपयशी ठरले आहेत. मुंबई विद्यापीठातील अभूतपूर्व गोंधळाबाबत पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारू, अशी घोषणा काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी रविवारी केली. विद्यापीठातील गलथान कारभाराविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात अक्षम्य दिरंगाई झाली आहे. मुंबईच्या प्रश्नपत्रिका नागपूरला पाठवाव्या लागल्या आहेत. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका नागपूरला पाठविण्याची वेळ यावी, इतकी निष्क्रीयता कशी काय खपवून घेतली जाते, असा सवाल करतानाच या साऱ्याबाबत येत्या अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. याशिवाय, अलीकडेच राज्यातील १३ हजार जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा तुघलकी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे हजारो शिक्षकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. तर, कुलगुरू संजय देशमुख मुंबई विद्यापीठाचा कारभार सांभाळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. शैक्षणिक आणि प्रशासकीय आघाडीवरील त्यांच्या अपयशामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या सर्व प्रकाराबाबत अधिवेशनात सरकारला जाब विचारू, अशी घोषणा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत केली. शिक्षण खात्यातील गोंधळाचा मुद्दा अधिवेशनात लावून धरणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
निकालासाठी उजाडणार १५ आॅगस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 5:30 AM